<
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ ही संकल्पना घेऊन वडगाव ।।बु।। येथे आयोजन
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर व जलसंधारण बंधारा बांधण्यात आला , वडगाव ।।बु।। येथे संपन्न झाले. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या शिबिराची मध्यवर्ती संकल्पना होती.
शिबिराच्या समारोप प्रसंगी अध्यक्ष म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही.टी. जोशी उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, की राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर हे महाविद्यालय आणि गाव यांना जोडणारा दुवा आहे. या शिबिराच्या माध्यमातून सामाजिक कामे केली जातात. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी रुजवण्याचे काम अशी शिबिरे करत असतात. देशाला उत्तम नागरिक द्यायचे असतील तर अशा शिबिरांची नितांत आवश्यकता आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार केले जातात आणि भविष्यात एक चांगला नागरिक म्हणून हा विद्यार्थी देश घडवतो.
समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक विजय देशपांडे, समाधान पाटील, निवृत्त शिक्षक पदमसिंग पाटील, निवृत्त मुख्याध्यापक एस.के. राठी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील,डॉ. एस.डी. भैसे उपस्थित होते.
श्रमदान, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आपत्ती व्यवस्थापन, शौचालय निर्मिती आणि जनजागृतीसाठी महिला मेळावा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरामध्ये सात दिवस करण्यात आले होते. ‘स्वच्छ भारत-माझी वसुंधरा, जलसंवर्धन व व्यवस्थापन’ या विषयावर भडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे, ‘जैवविविधतेत सर्पांचे महत्त्व’ या विषयावर सर्पमित्र हर्षल भदाणे, ‘सौर ऊर्जेचा वापर’ या विषयावर चंद्रशेखर महाजन, ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावरील महिला मेळाव्यात भडगाव पंचायत समितीच्या सभापती अर्चना पाटील, माजी नगरसेविका योजना पाटील, भडगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष रेखा पाटील, बँक व्यवस्थापक कांचन अहिरे, सरपंच सविता पाटील, स्वप्नील पाटील, ‘कृषी उत्पादन वाढीसाठी उपाययोजना’ या विषयावर तालुका कृषी अधिकारी बी.बी. गोरडे, ‘ग्रामविकासाच्या शासकीय योजना’ या विषयावर डॉ. बी. एस. भालेराव, ‘आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर डॉ. एस.डी. भैसे, ‘वित्तीय व्यवस्थापन’ या विषयावर डॉ. सचिन हडोळतीकर, ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ या विषयावर संस्कृती फाऊंडेशनचे संचालक डी. बी. कोळी व डोएश बँक, पुण्याचे मयूर महाजन तर ‘जातीमुक्त भारत’ या विषयावर डॉ. ए. एन. भंगाळे या मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
शिबिरादरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सचिन नांद्रे व इतर मान्यवरांनी सदिच्छा भेटी दिल्या आणि स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
विशेष उल्लेखनीय म्हणजे शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र, कजगाव यांच्या सहकार्याने ‘कोरोना लसीकरण कार्यक्रम’ राबविण्यात आला. त्याचप्रमाणे जनावरांना लस, जंतांची तपासणी व टॅगिंग करून औषधी देण्यात आली. यासाठी कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे रमेश राठोड, मुकुंद वानखडे तसेच भडगाव पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. जी.एस. अहिरराव यांनी समारोपीय कार्यक्रमात शिबिराचा अहवाल सादर केला. महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. आर.एम. गजभिये यांनी आभार मानले. साहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.ए. कोळी, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, तुळशीराम महाजन, मनोहर महाजन व स्वयंसेवकांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.