<
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थिनींसाठी एकदिवसीय व्यक्तिमत्त्व विकास शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव आणि श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील एकूण ६० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
मुलींनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे रहावे. आत्मविश्वासाने आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला सामोरे जावे. अशा शिबिरातून आपले व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी एक उत्तम संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे. त्याचा योग्य वापर करून घ्यावा, असे आवाहन पाचोरा नगरपरिषदेच्या नगरसेविका सुचेता वाघ यांनी केले. त्या शिबीराच्या उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील होते. प्रमुख पाहुण्या म्हणून रेखा पाटील, सुनीता वारुळे व डॉ. एस. डी. भैसे व्यासपीठावर उपस्थित होते.
व्यक्तिमत्त्व विकास शिबीराच्या पहिल्या सत्रात जळगाव येथील मूळजी जेठा महाविद्यालयातील प्रा.डॉ. लीना ढाके या वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महिला सक्षमीकरणात कोणत्या अडचणी आहेत, सक्षम होण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, याबाबत विविध सक्षम महिलांची उदाहरणे देऊन विद्यार्थिनींनी सक्षम होण्यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल देशमुख यांनी ‘स्पर्धा परीक्षा व मुलाखत तंत्र’ या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
मुलाखतीला जाताना आपला पेहराव तसेच आपली देहबोली यावर विशेष लक्ष केंद्रित करावे. चौफेर वाचन व सूक्ष्म निरीक्षण हे आवश्यक आहे. भारतीय विदेश सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी व लेखक ज्ञानेश्वर मुळे यांच्या ‘माती पंख व आकाश’ या आत्मकथनातील संघ लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीचा दाखला दिला. तिसऱ्या सत्रात ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील उपप्राचार्य व हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. जे.व्ही. पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी यावेळी आपला आत्मविश्वास वाढण्यासाठी वाचनाचे किती महत्त्व आहे ते पटवून दिले. व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे काय? शारीरिक प्रभावाबरोबर आपले मानसिक, बौद्धिक आणि भावनिक विकास होणे का आवश्यक आहे व यासाठी आपण काय केले पाहिजे, याबाबत स्वजीवनातील विविध उदाहरणे सांगत व्यक्तिमत्त्व विकासाबाबत अनमोल अशा टिप्स दिल्या. चौथ्या सत्रात स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुवर्णा पाटील यांनी ‘स्त्रियांचे आरोग्य’ याबाबत मार्गदर्शन करताना स्त्रियांनी विविध जीवनसत्त्व मिळवण्यासाठी कोणता आहार घ्यावा व त्यासाठी काय काळजी घ्यावी, हे विविध उदाहरणातून पटवून दिले. आजच्या आहारशैलीतून आपणास काय त्रास होतो हे देखील सांगितले. प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप झाला. शिबिर यशस्वितेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. दीपक मराठे, युवती सभा प्रमुख प्रा. डॉ. चित्रा पाटील, साहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. शिवाजी पाटील, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. दिनेश तांदळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.एल. जी. कांबळे, डॉ. गजानन चौधरी, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. स्नेहा गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.