<
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक नानासाहेब देशमुख उपस्थित होते. प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड हे वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांचे यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा देणारे व्याख्यान झाले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. प्रा. एस. एम. झाल्टे व डॉ. बी.एस. भालेराव यांनी बुद्ध वंदना म्हटली.
डॉ. एन.एन.गायकवाड यांनी आपल्या व्याख्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी बोलताना म्हणाले की, बाबासाहेबांना जन्मापासूनच आपल्या आयुष्यात अनेक संघर्षपूर्ण प्रसंगांना सामोरे जावे लागले. तरी या देशाला त्यांनी संविधानाच्या रुपाने एक महान भेट दिली. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी मूल्यांची भारताला नव्याने ओळख करून देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. तथागत गौतम बुद्ध यांचा समतेचा मार्ग त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आणखी प्रशस्त केला. कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्वान विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये बाबासाहेबांना अग्रस्थान दिले होते. अशा प्रकांड पंडित व विद्वान माणसाने संपूर्ण भारतीयांच्या जीवनाला नवा आकार मिळेल असे अपूर्व कार्य करून ठेवले आहे. संविधानाच्या प्रत्येक कलमातून आणि संविधान सभेत झालेल्या चर्चेतून बाबासाहेबांच्या विद्वत्तेचे दर्शन घडते. त्यांनी उभ्या केलेल्या संस्थात्मक कार्यातून आधुनिक भारताचा पाया रचला गेला. पीपल्स एज्युकेशन सोसायटी हे त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
नानासाहेब देशमुख यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ दलित, शोषित, पीडित व मागासवर्गीयांचे कैवारी म्हणणे चुकीचे ठरेल. त्यांनी केलेले कार्य हे प्रत्येक भारतीयासाठी केले आहे. संविधानाच्या माध्यमातून भारतीय माणसाचा भाग्योदय झाला आहे. आज भारतात नांदणारी समता, बंधुता व न्याय ही मूल्ये संविधानाची देण आहे. याचे सर्व श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना द्यावे लागेल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती पुण्यतिथी समितीचे अध्यक्ष डॉ. एन.व्ही. चिमणकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डी.ए. मस्की यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. आर.एम. गजभिये यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.