जळगाव – (प्रतिनिधी) – संगीत हे अनेक असाध्य आजारांवर परिणामकारक उपचार पद्धत म्हणून सिद्ध झाली असून जळगावात थॅलॅसिमियाग्रस्त मुलांसाठी असा प्रयत्न कोसला फाउंडेशन तर्फे सरगम संगीत विद्यालयाच्या माध्यमातून केला जाणार आहे.
या संगीत विद्यालयाचे उद्घाटन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी डॉक्टर मुंढे म्हणाले की, मी सुद्धा एक डॉक्टर आहे. परंतु संगीतातून रुग्णावर होणाऱ्या उपचार पद्धती बद्दल माहिती मिळाली. या विद्यालयात जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विद्यार्थी शिकत आहेत. याबद्दल कौतुक करून त्यांनी भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. व्यासपीठावर केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. धर्मेंद्र पाटील कोसला फाउंडेशनचे अध्यक्ष जन्मेजय नेमाडे,डॉ. सई नेमाडे उपस्थित होते. मनोगतात भरत अमळकर यांनी, थॅलेसिमिया ग्रस्त मुलं समाजात जन्माला येणार नाही यासंदर्भात जनजागृती करण्यासोबतच अशा मुलांना अधिक सुलभ सेवा देण्यासाठी केशवस्मृती प्रतिष्ठान तर्फे आवश्यक ते पावलं उचलली जातील असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोसला फाऊंडेशनच्या सचिव सई नेमाडे यांनी संगीत उपचार पद्धती बद्दल उदाहरणांसह स्पष्ट करून हा उपक्रम अधिक मोठ्या करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.
कार्यक्रमात लॅब टेक्निशियन दिलीप नारखेडे यांनी त्यांच्या आईच्या स्मृति प्रित्यर्थ रुपये 11000 देणगी दिली. तसेच यावेळी संगीत शिक्षक रौफ शेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
थॅलेसिमिया ग्रस्त मुलांच्या सहभागासाठी पालकांनी प्लाझ्मा लॅब, नेहरू चौक, जळगाव येथे संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष जनमेजय नेमाडे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे तसेच कार्यक्रमासाठी मनीष सिकरवार, शायना मलिक, अबुझर खान, आयाज शेख, मुकेश पाटील, किशोर पाटील, सोनाली पाटील व दिलीप नारखेडे आदींनी परिश्रम घेतले.