<
जळगाव,(प्रतिनिधी)- समाजाचे देणं लागतं याची जाणीव महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाला असून पत्रकारांच्या संकट काळी धावून जाणारा हा पत्रकार संघ आहे. पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी पत्रकारांना शासकीय – निमशासकीय समितीवर नियुक्त करण्याची मागणी केली असून याबाबत नक्कीच सकारात्मक विचार करून पत्रकारांना संधी देऊ असे आश्वासन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई चे उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशन रविवार दि. १ मे २०२२ रोजी जळगाव येथे पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत व पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी केले.
वृत्तपत्र क्षेत्रात स्थिरता हवी असल्यास वृत्तपत्रांची किंमत वाढवावी लागेल – प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे
कोरोना नंतरच्या काळात वृत्तपत्र क्षेत्रात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून कोरोनाचा सर्वाधिक फटका हा वृत्तपत्र क्षेत्राला बसला असून वृत्तपत्र क्षेत्रातील अस्थिरता थांबवायची असल्यास वृत्तपत्रांची किंमत वाढवावी लागेल आणि वाचकांना देखील तशी मानसिकता तयार करावी लागेल असे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यावेळी म्हणाले.
मुकनायक व जीवनगौरव पुरस्कार वितरण
जेष्ठ पत्रकार कैलास शिंदे यांना मुकनायक पुरस्कार तर जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले, आल्हाद जोशी, हेमंत काळुंखे, प्रकाश खंडागळे यांना मंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशनला “सेवाभाव पुरस्कार”
कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण भारत बंद असताना रोज दोन वेळच्या भोजनाची परवड होतं असतांना आपल्या भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन ने अशावेळी ‘स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम हाती घेऊन गरजू लोकांसाठी रोज दोन वेळ लाखो अन्न पाकिटांचे वाटप शहरात सुरू केले होते.कोरोना संपून सारं काही सुरळीत झाले असलं तरी आपण ‘स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम आता अविरत सुरू ठेवला आहे, जळगाव शहरात कोणीही उपाशी राहू नये, ही या उपक्रमामागील भावना आहे. आजही दररोज अनेक गरजूंना ही शिदोरी वितरीत होत असल्याने गरजू नागरिकांच्या दोन वेळच्या जेवणाची परवड थांबली आहे.
या ‘सेवाव्रत’ कार्याबद्दल ‘कृतज्ञता’ व्यक्त करत भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशनला ‘सेवाभाव’ पुरस्कार मंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित केले.
पत्रकारांना 2 लाखाच्या अपघात विमा वितरित
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांचा दोन लाख रुपयाचा अपघात विमा काढण्यात येत असून आज अधिवेशन कार्यक्रम प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात आठ पत्रकारांना प्रमुख पाहुणे म्हणून आ. सुरेश भोळे(राजुमामा),महापौर सौ. जयश्री महाजन,माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे,महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे प्रदेशाध्यक्ष ऍड. सिद्धार्थ इंगळे, श्री. राजपूत करणी सेनेचे राज्य उपाध्यक्ष प्रविण पाटील,पत्रकार संघांचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे,मनोकल्पचे संचालक मनोज वाणी, मंगळग्रह संस्थांनाचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या हस्ते विमा वितरित करण्यात आला.
यावेळी पत्रकार संघांचे राज्य प्रसिद्ध प्रमुख नवनाथ जाधव, मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी, उपमाहापौर कुलभूषण पाटील शालिग्राम गायकवाड, मुकुंद नन्नावरे, प्रविण सपकाळे, किशोर रायसाकडा,प्रमोद सोनवणे, मिलिंद लोखंडे,जिल्हाध्यक्ष जितेंद्रसिंग राजपूत, जगदीश सोनवणे, प्रदिप गायके, दीपक सपकाळे, शरद कुलकर्णी,भूषण महाजन,नजनीन शेख, भगवान मराठे, संजय चौधरी,कमलेश देवरे,विलास ताठे, भानुदास चव्हाण,विजय गाढे,महेंद्र सूर्यवंशी, गोपाल सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयाज मोहसीन यांनी केले.
पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने आर.एल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यासाठी हॉस्पिटल चे संचालक श्री.राजऐश्वर्य जैन यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलचे डॉक्टर्स, कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले. तर रेड प्लस रक्त पेढीच्या वतीने पत्रकारांसाठी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी रक्तपेढीचे अमोल शेलार, दीपक पाटील आदी यांचे सहकार्य लाभले.