<
जळगांव, दि.१०-(जिमाका) :- मान्सुन काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजनांची तयारी पूर्ण करुन घ्यावी. जिवीत व वित्त हानी टाळण्याकरीता सुक्ष्म नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आज मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की ,मान्सुन काळात उद्भवणाऱ्या विज, अतिवृष्टी, पूर ,महापूर, दरड कोसळणे इत्यादि नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजनांची पूर्वतयारी करणे आवश्यक असून यामुळे आपत्कालीन काळात होणारी जिवीत व वित्त हानी टाळणे शक्य होईल.
यासाठी सर्व यंत्रणानी सज्जता ठेवावी तसेच विभाग निहाय आराखडे SOP अद्यावत करावे, विभाग निहाय नियंत्रण कशाची स्थापना करावी व 24×7 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करावी, आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची तपासणी करून सर्व साहित्य सज्ज ठेवावे .सर्व विभागांनी परस्परांशी समन्वय ठेवावा व येणार्या संभाव्य आपत्तीचा समर्थ पणे मुकाबला करावा. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव राहुल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शपंकज आसिया , पाटबंधारे विभाग ,बांधकाम विभाग, सर्व प्रांत अधिकारी,सर्व तालुक्याचे तहसीलदार,गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी ,पोलीस व होमगार्ड विभाग, उप प्रादेशिक परिवहन विभाग, जलसंपदा, महावितरण, महापारेषण, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, परिवहन विभाग इत्यादि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यात प्रामुख्याने नदीकाठच्या गावांबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्य़ातील तापी, गिरणा, वागुर या प्रमुख नदी काठच्या गावांबाबत प्राधान्याने सतर्क राहावे. छोटे नाले, ओढे, नद्या, यांना अचानक येणाऱ्याu पुराच्यावेळी दुर्घटना घडू नये यासाठी दक्षता घ्यावी. ज्या गावांमध्ये, वसाहतींमध्ये अतिपर्जन्याची शक्यता आहे तसेच गेल्या वर्षात ज्या ज्या ठिकाणी जास्त पाऊस झालाu आहे, अशा सर्व ठिकाणी स्थलांतराची पर्यायी व्यवस्था, शाळा, समाज मंदिर, इतर सुरक्षित ठिकाणे तयार ठेवावीत. त्या जागी औषधी, पाणी, जेवणाची व्यवस्था राहिल याची खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने छोटे/मोठे पुलांचे सर्वेक्षण करुन त्यांची दुरूस्ती करुन घ्यावी. जिल्हा परिषदेने सर्व तलाव, पाझर तलाव, नद्या काठावरची गावे यांची प्रत्यक्ष पाहणी करुन संरक्षणाचे उपाय योजावेत. ज्या ठिकाणी तलाव, धरणाच्या भिंती, दरवाजे, इतर बाबींची दुरूस्ती करणे गरजेचे आहे त्या ठिकाणी तातडीने दुरूस्ती कामे पूर्ण करावीत. धरणे, पाझर तलाव या ठिकाणी चोवीस तास देखरेख यंत्रणा तयार ठेवावी. पूरप्रणव क्षेत्र/गावे याबाबत लाल व निळ्या गावांबाबत माहिती घेऊन संबंधित यंत्रणेसह सतर्क राहावे. नदीपात्रात अतिक्रमणे असल्यास तात्काळ काढण्यात यावीत.
हवामान खात्याच्या संपर्कात राहून दक्षतेचे इशारे, सुरक्षेचे उपाययोजना म्हणून वेळेत सर्व यंत्रणा व सर्वसामान्य नागरिकांपर्यत माहिती पोहोचवावी. तसेच राष्ट्रीय/राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या संपर्कात रहावे. त्यांच्या कार्यपध्दतीची माहिती करुन घ्यावी. महानगरपालिका/नगरपालिका क्षेत्रातील नाले सफाई, ड्रेनेज, पाईपलाईन दुरूस्ती तात्काळ करण्यात यावी. धोकादायक व अनधिकृत होर्डिग ताबडतोब काढावेत इत्यादि सुचना देण्यात आल्या.
बैठकीत पावर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ यांनी सादरीकरण केले. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. नायब तहसीलदार अमित भोईटे. महसूल सहायक सुनील पवार मोहनीश बैंडाळे यांनी सहकार्य केले.