<
अलिबाग, दि.29 (जिमाका):- अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले, ते केवळ सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच, याचा लाभ जिल्ह्यातील सर्व जनतेला निश्चित होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.
अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय येथील जिल्हा शल्यचिकित्सक प्रशासकीय इमारत व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ग्रंथालय व व्याख्यान कक्ष इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजय सोनुने, सहाय्यक अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या, हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्यासाठी सर्वांनी अथक परिश्रम घेतले व त्याचे फलित म्हणूनच आजचा दिवस आपण पाहत आहोत. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख या सर्वांचे बहुमूल्य असे पाठबळ लाभले, त्याबद्दल या सर्वांचे विशेष आभार मानते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.सुखदेवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विहित कालावधीत जिल्हा शल्यचिकित्सक प्रशासकीय इमारत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ग्रंथालय व व्याख्यान कक्षाचे काम उत्तमरित्या पूर्ण केल्यामुळे ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. या सर्व कामास जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे तसेच प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले, असे सांगून शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.श्रुती पांडे यांनी केले.