<
जळगाव-(प्रतिनिधी)-पृथ्वीवर पाण्यावाचून कोणताही सजीव जगू शकत नाही. तो मानव असो, पशु-पक्षी, वृक्ष या अगदी पाण्यातील जीवजंतू या सर्वांना पाणीच आवश्यक आहे. मात्र पाणी नसेल तर सजीवसृष्टीचे नसेल, त्यामुळे विद्यार्थीदशेतच पाणी बचतीचा संस्कार प्रत्येकाने रूजवून घ्यावा आणि संस्कारातून पाण्याचे जतन करावे आणि उज्ज्वल भविष्य घडावे असे प्रतिपादन जैन इरिगेशनचे शास्त्रज्ञ डॉ. सुब्रमण्यन यांनी केले.
जैन इरिगेशन, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आणि गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या जलसंरक्षण अभियानाअंतर्गत पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या पोस्टर प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी स्कूलचे प्राचार्य गोकुळ महाजन, उपप्राचार्य रूपेश घाटगे, जैन इरिगेशनचे आनंद पाटील उपस्थित होते. रोपट्याला पाणी देऊन पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनाद्वारे पाणी बचतीसह पाण्याविषयी संवेदनशील अशी रोचक माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले जात आहे. त्याद्वारे पाणीबचतीचे मार्ग विद्यार्थ्यांना गवसत आहे. उद्घाटन प्रसंगी पुढे बोलताना डॉ.सुब्रमण्यन यांनी सादरीकरण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी पाण्याचे महत्त्व वैज्ञानिकदृष्टीने पटवून सांगितले. पाणी हे अमूल्य असून त्याचा जपून वापर केला पाहिजे कारण पाणी निर्मिती करणे आतापर्यंत वैज्ञानिक कसोटीवर शक्य झाले नसून पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती होय असेही त्यांनी स्पष्ट केले.
आनंद पाटील यांनी पोस्टर प्रदर्शनामागील भुमिका स्पष्ट करताना सांगितले की, भारतीय संस्कृतीत पाण्याला देवासमान मानले असून त्याचा गुणधर्मामुळे पाणी देवत्व प्राप्त करते. त्यामुळे पाण्याची बचत करणारी पिढी घडावी यासाठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी हितगूज करून पाण्याचे महत्त्व पोस्टर प्रदर्शनाद्वारे पटवून दिले जात असल्याचे ते म्हणाले. पाणी बचतीची प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला. यशस्वीतेसाठी जितेंद्र कापडे, सुनिलकुमार पाटील, रंजना गवळी, कीर्ती पाटील, हिरालाल गोराणे, अश्विनी बावस्कर यांनी सहकार्य केले. स्नेहा बागुल यांनी सुत्रसंचालन केले.