<
पुणे – (प्रतिनिधी) – दिवसेंदिवस शेतीचे क्षेत्र घटत आहे त्यामुळेच भविष्यात अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यासाठी कमीत-कमी जागा, पाणी व नैसर्गिक संसाधनांचा वापर करून शेतमालाचे अधिकाधिक उत्पादन घेता यावे यासाठी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. ने एकात्मिक सिंचन प्रणाली विकसीत केली आहे. हे ग्रामीण भागातील विकासाला पूरक ठरू शकते. असे जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी सांगितले.
नाबार्डच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या स्थापनादिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून अतुल जैन ‘शेती तंत्रज्ञानातून ग्रामीण विकास’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सीजीएम एस. जी. रावत, बुचकेवाडी सरपंच सुरेश गायकवाड, राहूरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. सी. पाटील, हायटेक अॅग्री विभागाचे प्रमुख प्रो. एस. टी. गोरंटीवार, आयुक्त एएच रविंद्र प्रताप सिंग, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सीजीएम अजय कुमार सिंग, आरसीएस अनिल कावडे, रिझर्व्ह बँकेचे आरडी अजय मिचयारी, बीओएमचे इडी एबी विजयकुमार उपस्थित होते. यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकारी, रिझर्व्ह बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी, बँंकर्स, सामाजिक संघटना, फार्मर्स प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन (एफपीओ), व जैन इरिगेशनचे सिनियर व्हिपी डॉ. मधुसूदन चौधरी आणि महाराष्ट्रातील नाबार्डच्या विभागीय कार्यालयातील अधिकारी वर्ग उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते ‘नाबार्ड इन महाराष्ट्र 2021-22’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने झाली होती.
शेती तंत्रज्ञानातून ग्रामीण विकास या विषयावर संवाद साधताना अतुल जैन म्हणाले की, जैन इरिगेशनच्या नाविन्यपूर्ण संशोधनातून अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादन वाढून त्यांचा आर्थिक विकास झाला आहे. यात जवळपास 80 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल घडून आला आहे. दक्षिण आफ्रिका यासह भारतात एकात्मिक सिंचन प्रणालीद्वारे जमातींवर आधारीत प्रकल्प कार्यरत आहेत. त्यातून सूक्ष्म अर्थव्यवस्था आणि दीर्घ अर्थव्यवस्थेत, पायाभूत सुविधा व कृषिक्षेत्रात, भांडवल व मजूरांची उपलब्धता आणि उत्पादकता, खर्च आणि मूल्य यांच्यात ताळमेळ घालून शाश्वत विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. टिश्यूकल्चर तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांच्या फळलागवडीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. केळी, डाळिंब, स्ट्रॉबेरी, कॉफी, पेरू यासह लिंबूवर्गीय फळे यांची टिश्यूकल्चर रोपे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केल्याने त्यांच्या उत्पादनात वाढ झाली.
जैन ऑटोमेशन, ठिबक सिंचन तंत्रज्ञानातून अचूक खतांचे व्यवस्थापन होऊन मजूरीचा खर्चही टाळला जात असल्याने शेतकऱ्यांची वेळ, खर्च वाचत आहे. शेतीक्षेत्रात क्रांतीकारक बदल होत असताना जैन इरिगेशनने अतिसघन आंबा लागवड ही पद्धत आणली यातून एकरी फळझाडांची संख्या वाढून उत्पादन वाढत आहे.
ठिबकवर भात शेतीचा यशस्वी प्रयोगातून मोठ्याप्रमाणात पाण्याची बचत होऊन विजेचेही बचतीला हातभार लागला आहे. यातून विक्रमी उत्पादन घेता आले. पारंपारिक पद्धतीपेक्षा ठिबकद्वारे भात पिकविल्यास 40 टक्के उत्पादन वाढ शक्य करता आली. यातून सुमारे 70 टक्यांपर्यंत पाण्याची बचत करता आली. पाणी व खतांच्या कार्यक्षमतेत 80 टक्के पर्यंत वाढ करता आहे. यातून जमीनीची सुपिकताही सुरक्षित राहते. स्प्रिंकलर आणि ठिबकद्वारे ऊस शेतीतून शेतकरी समृद्धीचा मार्गावर आले आहेत असे मनोगत अतुल जैन यांनी व्यक्त केले. कृषितंत्रज्ञानातून शेतकऱ्यांना उन्नती मार्ग मिळेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार श्रीमती रश्मी दराड यांनी मानले.