<
जळके/जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील जळके (वसंतवाडी) येथे काल दि. १६/०९/२०१९ रोजी वसंतवाडी तांडा येथे वीजचोरी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये लघुदाब वाहिनी चा कंडक्टर काढून कमी क्षमतेची केबल टाकण्यात आली. काम झाल्यानंतर ट्रान्सफॉर्मर चालु करण्यास लाईनस्टाफ गेले असता सदर ठिकाणी काही ग्रामस्थांनी ” सर्वांची लाईट सुरु ठेवा नाहीतर डीपी चालु करू देणार नाही. लाईट तुमच्या बापाची नाही” सांगुन कर्मचाऱ्यांना ट्रान्सफॉर्मर चालु करण्यास मज्जाव केला. त्यामुळे वसंतवाडी सरपंच श्री. पाटील यांना हि माहीती कळवून कर्मचारी तेथुन माघारी आले संध्याकाळी ६.३०वाजेचे सुमारास तेथील (मीटरधारक व आकडेधारक) ४० ते ५० ग्रामस्थांनी सबस्टेशन मधे येऊन ऑपरेटर व लाईनस्टाफ ला धमकविण्याचा प्रयत्न केला. तसेच प्लास्टिक खुर्च्या तोडून, लॉगशीट ,रेकॉर्ड फाईल, रजिस्टर्स फाडून कंपनीचे मालमत्तेचे नुकसान केले आहे. संध्याकाळी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती. बर्याच जबाब, विचारणा, पडताळणी अंती मध्यरात्री १वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल करण्यात आली. घटनेच्या वेळी सबस्टेशन मधे उपस्थित असलेले श्री. महाजन यांनी गु.र.नं. ६६१ प्रमाणे ९जणांविरुद्ध कलम ३५३, ४२७ व इतर ६कलमांनुसार फिर्याद दिली आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करतेवेळी ऑपरेटर महाजन यांचेसोबत अभियंता सुलक्षणे आणि वावडदा कक्षातील सर्व लाईनस्टाफ तसेच वसंतवाडी सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष इ. उपस्थित होते.