<
नवी दिल्ली – (वृत्तसंस्था)
भाजपा खासदार अनिल फिरोजिया हे त्यांच्या पाच वर्षीय मुलीसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटावयास पोहोचले होते.
यावेळी मोदी आणि ह्या चिमुकलीमध्ये झालेला संवाद ऐकून उपस्थितांमध्ये हस्यकल्लोळ झाला. फिरोजिया हे भाजपाचे मध्य प्रदेशातील उज्जैनमधील खासदार असून, ते पंतप्रधानांच्या भेटीसाठी सहपरिवार संसदेत पोहोचले होते. त्यांनी या भेटीचे छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केलेली आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी फिरोजिया यांची कन्या अहानाला “मी कोण आहे, माहिती आहे का?” असे विचारले असता अहानाने “हो, मला माहिती आहे की, तुम्ही मोदीजी आहात. तुम्ही रोज टीव्हीवर दिसता”, असे उत्तर दिले.
यानंतर नरेंद्र मोदींनी तिला ‘मी काय काम करतो, माहिती आहे का?’ असे विचारले असता तिने “तुम्ही लोकसभेत नोकरी करता” हे उत्तर दिले असता ते ऐकताच पंतप्रधान मोदींसहित उपस्थितांना हसू आवरले जात नव्हते. जाण्याआधी मोदींनी या चिमुकलीला चॉकलेटही दिले. याआधीही नरेंद्र मोदी अनेकदा लहान मुलांसोबत संभाषण करताना दिसले आहेत.
“हा एक अविस्मरणीय दिवस आहे. जगातील सर्वात लोकप्रिय नेता, देशातील सर्वात यशस्वी पंतप्रधान आणि सर्वाधिक आदऱणीय नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा मान मिळाला. त्यांचे आशीर्वाद तसंच निस्वार्थ सेवेचा मंत्र मिळाला,”, अशा शब्दांत त्यांनी या भेटीबाबत ट्विट केले असून, या भेटीने माझ्या दोन्ही मुली आनंदी असून भारावून गेल्या असल्याचेही फिरोजिया म्हणाले आहेत.