<
मुंबई – (प्रतिनिधी)
एकीकडे उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यात वर्चस्वासाठी खडाजंगी सुरू असताना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय मान्यवरांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर आता बिंदुमाधव यांचे पुत्र निहार ठाकरे यांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला.
निहार ठाकरे हे बाळासाहेबांचे चिरंजीव बिंदुमाधव ठाकरेंचे पुत्र आहेत. त्यांची स्वतःची लॉ फर्म आहे. विशेष बाब म्हणजे ते भाजपाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत.
या भेटीबाबत निहार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करताना ‘आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार एकनाथ शिंदे नक्कीच पुढे घेवून जातील. या कार्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा आणि पाठिंबा आहे’. माझी स्वत:ची लॉ फर्म असल्याने एकनाथ शिंदेंना काही कायदेशीर मदत लागल्यास ती करणार असल्याचे म्हटले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच निहार हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा करतील, अशी शक्यताही वर्तविली जात आहे.