<
चाळीसगाव-जिमाका- केंद्र शासनाने प्रगती योजनेत राष्ट्रीय कुष्ठरोग र्निमुलन कार्यक्रमाचा समावेश केला असुन योजनेंतर्गत चाळीसगाव तालुक्यात 13 ते 28 सप्टेंबर 2019 दरम्यान संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम व असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरुकता अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानात जनजागृतीच्या माध्यमातुन समाजात दडून असलेले नविन कुष्ठरुग्ण/क्षयरुग्ण शोधुन त्यांना तात्काळ उपचार सुरु करुन रोगप्रसाराला आळा घालून ह्या रुग्णांना पुन: मुख्य प्रवाहात आणून त्यांना समाजात नव्याने सन्मानाने जगण्यायोग्य करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. या शोधमोहिमेची जनजागृती करण्याच्या हेतुने ग्रामिण व शहरी भागात व्यापक स्वरुपात जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे.
मोहिमेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरीचे आयोजन करुन शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी माहिती सत्रांचे आयोजन करण्यात आले. विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी व नागरिकांना अभियानाबाबत माहिती देवुन त्यांच्या सहाय्याने समाजातील या रोगांबाबत गैरसमाज दुर करुन तसेच विविध प्रसार माध्यमांव्दारे माहिती देण्यात येईल. ठिक-ठिकाणी अभियानासंबंधी माहिती देणारे बॅनर व होर्डीग इत्यादी माध्यमातून या रोगासंदर्भात जनजागृती करण्यात आली शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानके, आठवणे बाजार अशा सार्वजनिक ठिकाणी स्टॉल लावुन माहीतीचा प्रचार व प्रसार करण्यात आला.
या शोध मोहिमेत तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात 13 ते 28 सप्टेंबर 2019 या कालावधीत आशा स्वयंसेविका- पुरुष स्वयंसेवक यांचा संयुक्त संघ बनवून प्रत्येक घरोघरी जावून या आजारांबाबत गैरसमज दुर करण्यासाठी प्रत्येक घरातील सर्व सदस्यांची शारीरीक तपासणी करण्यात येत आहे. या सर्व शोधलेल्या संशयीत रुग्णांची तपासणी वैद्यकिय अधिकारी यांचेमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रांवर करण्यात येवून तपासणी नंतर निदान झालेल्या बाधित रुग्णास तात्काळ उपचार दिले जाणार असून संबंधित रुग्णांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल. या मोहिमेमुळे रोगप्रसाराला आळा बसण्यास मोठया प्रमाणात मदत होणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे यांनी सांगितले.
सदर रुग्ण शोध मोहिमे करीता ग्रामीण भागात 301 व शहरी भागात 23 टीम कार्यरत करण्यात आल्या आहेत. या करीता 648 आशा स्वयंसेविका व पुरूष स्वयंसेवकांमार्फत 14 दिवस घरोघरी जावून घरातील सर्व सदस्यांच्या शरीरावरील चट्टयांची तपासणी करण्यात येईल. 130 पर्यवेक्षक या मोहिमेवर देखरेख करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
सदर मोहिम यशस्वी होण्यासाठी तालुका स्तरावरुन आरोग्य विस्तार अधिकारी भागवत देवरे, तालुका कुष्ठरोग तंत्रज्ञ हमीद पठाण, धनंजय जाधव तसेच ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकिय सहाय्यक ठाकरे, चौधरी तसेच चाळीसगाव तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका इतर विशेष परीश्रम घेत आहेत. असे तालुका वैद्यकीय अधिकारी चाळीसगाव डॉ. देवराम लांडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.