आयुष्यावर बोलू काही
बऱ्याचदा आपण आपल्या मनातील दुःख, खंत आणि निराशा हे कोणाशीही शेअर करत नाही. कधी कधी जड मनाने नेहमीप्रमाणे आपण आपल्या दिनचर्येची सुरुवात करतो. ओठांवर हसू ठेवून निमूटपणे उराशी हे ओझे घेऊन जीवन जगत असतो. खरंतर प्रत्येकाला कोणासमोर तरी व्यक्त होऊन हे सर्व बोलायचे असते, परंतु व्यक्त होणे हे प्रत्येकाला जमतेच असे नाही.
ज्याचे त्याचे दुःख, खंत व निराशा ही जरी खाजगी आणि वैयक्तिक बाब असली, तरी ह्या सर्व गोष्टी मनात का साठवल्या जातात, याची कारणे व उपाय काय आहेत आज आपण जाणून घेऊयात.
कारणे:-
◆ भूतकाळात घडलेल्या वाईट घटना – आपल्या जीवनात अनेक चांगल्या वाईट घटना घडतात. यातील वाईट घटना जसे की, घरातील सदस्य गमावणे, नोकरी जाणे किंवा इतरही कारणे असू शकतात. यामुळे व्यक्तीच्या मनावर मानसिक आघात तर होतोच, शिवाय सातत्याने त्याच त्याच गोष्टीचा विचार करून प्रकृतीवरही विपरीत परिणाम होतो.
◆ भविष्याची चिंता – बहुतांश लोक हे वर्तमान जगण्यावर भर देण्यापेक्षा भविष्यात काय होणार? याबाबत अधिक विचार करतात, जसे की पालकांना त्यांच्या पाल्यांची चिंता, नोकरदार, व्यावसायिकांना काम वेळेत पूर्ण करण्याची चिंता वगैरे वगैरे. पण आपण कधी शांतपणे मनन, चिंतन करून हा विचार केला आहे का, की हे करण्यात आपला किती वेळ, मानसिक शक्तीचा व्यय झाला? काय यामुळे आपले प्रश्न सुटलेत? उलट यामुळे संताप व चिडकेपणा वाढला.
◆ वेळेचा अभाव – आजकाल धावपळीच्या जीवनात व व्यस्त दिनचर्येमुळे ताणतणाव, चिडकेपणा, दुखणे खुपणे इत्यादी वाढत असून, यामुळे कुटुंबियांना वेळ देणे अवघड झाले आहे. पालकांनाही मुलांसाठी, घरातील सदस्यांना कामाच्या व्यापामुळे धड दोन शब्दही बोलता येत नाही, एकाच घरात, एकाच खोलीत सदस्य अबोल, अनोळखी असल्यासारखे राहतात व लवकर व्यक्त होत नाही.
◆ इतरांना त्रास न देण्याची भावना – आपल्याला नेहमी वाटते ही मनातील या गोष्टी सांगून इतरांवर किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींवर याचा काय परिणाम होईल, याचा विचार करून गप्प राहून बोलणे टाळतो. एकाकी राहणे, एकटेपणा हेही एक कारण असते.
उपाय:-
या सर्वांवर उपाय म्हणून आपण आपल्या जवळचे मित्र, परिवारातील सदस्य किंवा जोडीदाराजवळ व्यक्त व्हायला पाहिजे. कामातून, अभ्यासातून कुटुंबियांसाठी वेळ काढून त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलणे, व्यक्त होणे आवश्यक आहे. भविष्याची चिंता करणे सोडून वर्तमानाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, कारण वर्तमानात केलेली कार्येच आपले भविष्य ठरवतात. दिवसातून एकदा तरी शांतपणे बसून मनन, चिंतन करावे.
शेवटी, “ये दुख बाँटने से कम होता है“….