<
पुणे – (प्रतिनिधी)
एकीकडे कोरोना, मंकीपॉक्स यासारखे आजार थैमान घालत असताना आणखी एका नवीन आजारामुळे पालक धास्तावले आहेत. हँड-फूट-माऊथ (एचएफएमडी) असे या आजाराचे नाव आहे.
कोण पडत आहे या आजाराला बळी?
या आजाराला सामान्यतः बारा वर्षांपर्यंतच्या वेगवेगळ्या वयोगटांमधील मुले बळी पडत आहे. धक्कादायक बाब म्हणजे बाह्यरुग्ण विभागात तपासलेल्या शंभरपैकी सुमारे दहा मुलांना या आजाराची लक्षणे दिसत असून, विशेषतः चार ते सहा वर्षे वयोगटातील मुलांमध्ये एचएफएमडीचा संसर्ग पटकन होतो.
हा आजार कशामुळे पसरतो?
हँड-फूट-माउथ हा आजार एंटेरो विषाणूंपासून होतो. हा अन्न-पाण्यामार्फत व आजारी मुलाच्या डब्यातले खाल्ल्याने पसरतो. दरवर्षी काही प्रमाणात याचे रुग्ण आढळतात. मात्र, मागील दोन-तीन वर्षांपासून कोरोना विषाणूचा उद्रेक सुरू असल्याने हँड-फूट-माउथ हा विषाणू आढळला नाही, कारण मुलांची शाळा बंद होती.
हँड-फूट-माऊथ ची लक्षणे काय?
सौम्य ताप, हातापायांच्या तळव्यांवर लालसर फोड येणे, तोंडाच्या आतमध्ये व्रण येऊन अन्नपाणी गिळण्यात त्रास होणे, कोपर-गुडघे यांनाही फोड येऊन खाज सुटणे व आग-आग होणे इत्यादी या आजाराची लक्षणे आहेत.
तज्ञ काय म्हणतात?
कांजिण्यासदृश दिसणारा हा आजार कांजिण्या वाटू शकतो, म्हणून कांजिण्याविरोधी औषधे घेण्यात तथ्य नसल्याचे डॉक्टर सांगतात. भारतात या विषाणूचे प्रमाण सौम्य असल्याने या आजाराची गुंतागुंत वाढत नाही.
यावर उपाय काय?
सर्वप्रथम हे लक्षात घ्या की, हा आजार संसर्गजन्य असून, एका मुलाकडून दुसऱ्या मुलाला तात्काळ होतो परंतु, तो एक ते दोन आठवड्यात बरादेखील होतो, म्हणून पालकांनी घाबरण्याचे कारण नाही. याकरिता आपण ताप, खाज व आग कमी होण्यासाठी औषधे व मलम वापरावीत तसेच तोंडातील व्रणांमुळे गिळण्यास त्रास होत असल्यास तोंडाच्या आतील भागांना औषधी मलम लावा तसेच बालकांचे डायपर बदलल्यानंतर हात स्वच्छ धुवा, असेही डॉक्टर सांगत आहेत.