<
जळगाव-(प्रतिनिधी)- संपूर्ण जगाला गांधी विचारांची अनिवार्यता असून गांधी विचारांचे संस्कार अत्याधुनिक पद्धतीने युवा पिढीसमोर गांधी तीर्थ पोहचवित आहे. त्यांचे हे कार्य पाहून खूप प्रभावित झालो असून गांधी विचारांचा संस्कार देणारी वास्तू म्हणजे गांधी तीर्थ असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांनी केले आहे.
जैन हिल्स परिसराच्या निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या गांधी रिसर्च फाउंडेशनच्या गांधी तीर्थला डॉ. जयंत नारळीकर यांनी पत्नी गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांच्यासोबत भेट दिली. जागतिक दर्जाच्या गांधी तीर्थ मधील प्रत्यक्ष अनुभव व्हावा असे गांधीजींचा रेल्वे प्रवास, गांधी विचार, गांधीजींची विविध संग्रहित भाषणे, संग्रहित पत्रे, पत्रव्यवहार भेटी प्रसंगी डॉ. नारळीकर यांनी अभ्यासली. प्रस्तुत स्थळी असलेली साहित्य संपदा महात्मा गांधीजींच्या जीवनातील निवडक घटना-प्रसंग उलगडून दाखविते. हे साहित्य पाहून मी खूप प्रभावित झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.