<
आरोग्य
मका म्हटले की आपल्याला भाजलेले मक्याचे कणीस आठवते. जे आपण लिंबू पिळून, मसाला लावून आवडीने खात असतो, पण यात अजून एक लक्षवेधी गोष्ट आहे, जिला आपण निरुपयोगी समजून फेकून देतो. ते म्हणजे मक्याच्या कणसाला असणारे चमकदार धागे. चला तर मग आज आम्ही तुम्हाला कॉर्न सिल्क म्हणजे मक्याच्या धाग्यांचे फायदे सांगणार आहोत….
◆ पोषकघटकांचा खजिना – आपण मक्याच्या सालीसकट या चमकदार धाग्यांनाही बऱ्याचदा कचरा समजून फेकून देत असतो, पण याच कॉर्न सिल्कमध्ये स्टग्मास्टरोल आणि सिटेस्टेरोल तत्त्व असतात, जे हृदयरोग आणि कोलेस्ट्रॉलपासून बचाव करण्यासाठी प्रभावीपणे काम करतात तसेच याने शरीरात ग्लूकोजचे प्रमाणही नियंत्रित राहते.
◆ अनेक आजारांवर गुणकारी औषधी – कॉर्न सिल्कच्या वापर अनेक आजारांच्या औषधांमध्येही केला जातो. मूत्राशयातील संसर्ग, मूत्रप्रणालीमध्ये सूज, मुतखडा
मधुमेह, जन्मजात हृदयाची समस्या, उच्च रक्तदाब आणि चक्कर येणे इत्यादींच्या उपचारासाठी ताज्या किंवा वाळवलेल्या दोन्ही रूपात कॉर्न सिल्कचा वापर केला जाऊ शकतो.
◆ ‘सी’ जीवनसत्त्वाने परिपूर्ण – या मक्याच्या धाग्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते. कॉर्न सिल्कमधील अँटीऑक्सिडंट तत्व हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे रोग दूर करून रक्तप्रवाह सुरळीत करतात.
◆ पचनक्रिया सुधारते – कॉर्न सिल्कने व्यक्तीची पचनक्रिया सुधारते, काही संशोधनाअंती हे सिद्ध झाले आहे की, यामुळे यकृताद्वारे पित्त स्त्राव वाढतो व स्त्रावलेले पित्त पित्ताशयात एकत्र होते, ज्यामुळे अन्न पचते.
◆ डोकेदुखीचा त्रास – जर तुम्ही डोकेदुखीच्या त्रासाने त्रस्त असाल तर कॉर्न सिल्क टीचे सेवन करणे यावर रामबाण उपाय ठरेल. यात दाहविरोधी व वेदनाशामक गुण असतात, ज्यामुळे ताणतणाव कमी होतो. इतकेच नाही तर खांदेदुखी, मान दुखणे, जबडा अकडणे अशाही समस्या पळून जातात.
◆ मूत्रपिंडासंबंधीचे रोग – मूत्राशय व मूत्रमार्गात संसर्ग, मुतखडा व मूत्रप्रणालीशी संबंधित भागांना सूज येण्याच्या समस्येवर घरगुती उपाय म्हणून आपण याचा वापर करू शकता.
◆ रक्तशर्करा कमी करते – मक्याच्या धाग्यांमध्ये इन्सुलिनचे प्रमाण वाढविणारे तत्व असल्याने यामुळे रक्तातील साखर कमी होते.
◆ वजन कमी करण्यास उपयुक्त – यात कॅलरी कमी असल्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते, पोट भरलेले राहते आणि शरीर विषमुक्त होण्यासही मदत मिळते.
◆ त्वचेसंबंधित समस्या – मक्याच्या धाग्यांमुळे खरचटणे, पिंपल्स, खाज, कीटक चावणे यापासून आराम मिळतो तसेच यातील जंतुनाशक तत्व त्वचेची हानी होऊ देत नाही.
◆ कॉर्न सिल्क टी कसा तयार करावा?
एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मक्याचे धागे टाका व हे पाणी गॅसवर उकळून थंड करून घ्या. यानंतर या चहाला गाळून घ्या. चांगल्या चवीसाठी आपण यात लिंबाचा रसही घालू शकता.
टीप – (वरील लेख हा केवळ माहितीसाठी असून, यातील कोणताही उपाय अथवा पदार्थांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावे.)