<
वाराणसी – (प्रतिनिधी)
आजकाल अनेक तरुण-तरुणी सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी किंवा आपल्या प्रिय व्यक्ती, दिनविशेषची आठवण म्हणून वेगवेगळ्या डिझाइन्सचे टॅटू काढतात, परंतु वाराणसी येथे घडलेल्या एका घटनेत हेच टॅटू काढणे ह्या तरुण मुलामुलींच्या जीवावर बेतले आहे.
वाराणसी येथे टॅटू काढल्याने १२ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याची घटना घडली असून, या बाधितांमध्ये १० मुले आणि २ मुलींचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील एका टॅटू पार्लर मध्ये एका एचआयव्ही बाधित व्यक्तीला टॅटू काढताना वापरण्यात येणारी सुई व साहित्याचे निर्जंतुकीकरण न केल्यामुळे या सुई व साहित्याचा वापर इतर १२ जणांवर करण्यात आला व यामुळेच त्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, याबाबत तज्ञ डॉक्टरांनी एचआयव्ही विषाणू हवेच्या संपर्कात आला, तर तात्काळ नष्ट होतो. एखाद्या व्यक्तीला टॅटू काढण्यास वापरलेली सुई दुसऱ्या व्यक्तीवर वापरणे हे धोकादायक आहे. जरी असे घडले तरी यामुळे एचआयव्ही होण्याची शक्यता फार कमी असते, असे सांगितले.