<
रावेर व यावल तालुक्यातील पशुधनावर लम्पी या विषाणू जन्य रोगाचा प्रादुर्भाव काही गावातील पशुधनावर दिसून येत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती यावल व सर्व तालुक्यातील ग्रामपंचायत, दूधडेअरी मार्फत लम्पी रोगाची प्रतिबंधात्मक लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
यावल तालुक्यातील फैजपूर, हंबर्डी,पिंपरूड, आमोदे, हिंगोणा बामणोद , न्हावी, बोरखेडा, अट्रावल , पाडळसे, दहिगाव, या गावांमध्ये 100% पशुधनचे यांचे लसीकरण करण्यात आले आहे .यामध्ये ग्रामपंचायत व दूधडेअरी यांच्या सहकार्याने लस खरेदी करून तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच तालुक्यातील खाजगी पशुवैद्यक यांच्या लसीकरणाचा कार्यक्रम यावल तालुक्यात याच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.
तालुक्यातील सर्व पशु पालकांना आव्हान करण्यात येते की आपल्या जनावरांना या रोगाची लागण होऊ नये. यासाठी गोचिड, गोमाशा, निर्मूलन करावे गोठ्याची स्वच्छता ठेवावी व आजारी जनावरांना वेगळे बांधून जागेवरच औषध उपचार करावा असे आव्हान डॉ. एस.एन. बढे पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती यावल यांनी केले आहे. लसीकरणाकामी तालुक्यातील डॉ. नितीन इंगळे , डॉ. ए.सी. पाटील, डॉ.आर. सी. भगुरे, डॉ. एम. पी .पाटील, पशुधन विकास अधिकारी तसेच आर. पी. ढाके, व्ही.बी चौधरी, यू .एन. पवार, युवराज पाटील, एन.एम. पाटील, ज्योती पाटील , पशुधन पर्यवेक्षक तसेच वाय. जी. नेवे, दिपक निकम, वराडे, धनगर, राजू महाजन ,दिनेश नेहेते, प्रशांत दुसाने सह कर्मचारी परिश्रम घेत आहे.
बैल, गाई दगावत असल्याने शेतकरी चिंतेत…
हंबर्डी सह परिसरातील लंम्पी या विषाणू जन्य या रोगाने बैल, गाई दगावत असल्याने काबाडकष्ट करणारा शेतकरी चिंतातुर झाला आहे. सध्या शेतातील पिकांचे कामे खोळंबून पडली आहे,. या घटनेमुळे शेतकरी अर्धपोटी उपाशी राहून तो डॉक्टरला बोलावून औषधोपचार करीत आहे तरीही बैल व गाई दगावत असल्याने शेतकरी फार बेजार झाला आहे. सर्जा राजाचा पोळा सण जवळ येऊन ठेपला आहे. बैलाची जय्यत तयारी करीत असताना ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्या शेतकऱ्यांच्या घरात पोळा सण होतो किंवा नाही याची काळजी वाटू लागली आहे. बैल व गाई दगावत असल्याने शासनाने याची दखल घेऊन पंचनामे करणे गरजेचे आहे व त्यास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. लम्पी या विषाणू जन्य रोगाचा पादुर्भाव वाढू नये म्हणून दफन विधीचा खर्च ग्रामपंचायतीनी करावा अशी मागणी शेतकरी वर्गानतुन होत आहे.