<
स्पर्धा परीक्षा क्लासेस च्या दूकानदारीमुळे गोर-गरीब पालकांची लूट !
जळगाव-(चेतन निंबोळकर)-अपेक्षांचे ओझे जास्त असले की, साधनांची कितीही पूर्तता झाली तरी यशापर्यंत पोहोचण्याचा काळ बऱ्याच अंशी अस्थिर झालेला असतो. ‘यश मिळावे’ ही अपेक्षा माफक आहे असे कधी म्हणताच येत नाही; कारण यशाची संकल्पना माफकतेच्या फार पुढे निघून गेलेली असते. यश ही सापेक्ष संकल्पना असल्यामुळेच, तिला अनेक फांद्या फुटलेल्या असतात. आणि या फांद्यांमुळेच बऱ्याचदा यशाच्या मार्गावरचा प्रवासी थकलेला, दमलेला, निराश झालेला, थांबलेला आणि कधी खचलेला-संपलेलाही पहायला मिळतो. प्रामाणिक कष्टांनंतरही अपयश जेव्हा समोर उभे राहते तेव्हा निराशा बळावलेली असते. अशा प्रकारे निराशा बळावण्याचे काम बरीच क्षेत्रे करीतच आहेत त्यातील युवकांच्या अनुभवातले क्षेत्र म्हणजे स्पर्धा परीक्षा होय …..!
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि राज्यसेवा परीक्षेच्या (एमपीएससी) तयारीचे मोठे केंद्र अशी जळगांव ची आणखी एक ओळख बनली आहे. त्यामुळे जळगांव नगरीच्या उत्पन्नातही भर पडली असून, बाहेरगावाहून फक्त या परीक्षांच्या तयारीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून जळगावातील या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांना वर्षांकाठी सुमारे लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून घेत आहे. विशेष म्हणजे या उत्पन्नात वेगाने वाढ होत आहे. बाहेरगावाहून जळगावात येणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. या परीक्षांच्या तयारीसाठी जळगावात येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. जळगावच्या जवळच्या ग्रामीण भागांतून, तालुक्यातून आणि इतर जिल्ह्यांमधून येणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे निरीक्षण क्लास संचालक नोंदवतात. बाहेरून जळगांवात येणाऱ्या उमेदवारांमध्ये दोन प्रकार आहेत.
एक म्हणजे एखादा अभ्यासक्रम करतांना परीक्षांची तयारी करणारे उमेदवार, आणि दुसरे म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षा देण्याच्या उद्देशानेच जळगावात येणारे उमेदवार…. स्पर्धा परीक्षांसाठी बाहेरून येणाऱ्या उमेदवारांची संख्या ही साधारण हजारांच्या घरात आहे. जळगावातील बहुतेक क्लास, अभ्यासिका या शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये थाटलेल्या आहेत. उमेदवारांचा ओढाही या संस्थांकडेच अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे जळगांव शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये एमपीएससी, यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांवर आधारलेली मोठी बाजारपेठच उभी थाटली आहे. परीक्षेची तयारी करून घेणारे क्लास हा अर्थातच या सगळ्यामधील मुख्य व्यवसाय आहे. बहुतेक क्लासेसमध्ये ३० हजार रुपयांपासून ७० हजार रुपयांपर्यत शुल्क आकारले जाते. क्लासेसला पुरक असा अभ्यासिकांचा दुसरा व्यवसाय आहे. वर्षभराचे सदस्यत्व, परीक्षेच्या काळापुरते सदस्यत्व असे पर्याय अभ्यासिकांमध्ये उपलब्ध आहेत. दिवसाला ८ ते १२ तास बसता येईल अशा अभ्यासिकाही जळगावात मोठय़ा प्रमाणावर आहेत. परीक्षेच्या तयारीसाठी आलेले उमेदवार जळगावमध्ये कॉटबेसीसवर राहतात. त्यामुळे त्यांना राहण्यासाठी भाडय़ाने जागा देणे, रोजची मेस, सकाळी आणि संध्याकाळी क्लासेस च्या परिसरामध्ये नाष्टा पुरवणे असे अनेक व्यवसाय सध्या जळगावमध्ये आहेत. याबाबत स्पर्धा परीक्षा करणार्या उमेदवाराने बोलताना सांगितले की, गेल्या ५ वर्षात परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढली आहे. यातील बहुतेक उमेदवारांचे घरचे उत्पन्न हे शेतीवर आधारित आहे.
क्लासेसची वाढती संख्या-
सध्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परिक्षांवर जास्त लक्ष केंद्रित असल्याने या शिवाय परीक्षेच्या आधी तीन महिने, परीक्षेपुरते चालवल्या जाणाऱ्या क्लासेसची तर गणतीच नाही. परीक्षेपुरत्याच सुरू झालेल्या क्लासेसचे शुल्क हे ३ ते ५ हजार रुपयांच्या घरात असते. त्यामुळे दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून या सराव वर्गांना किंवा क्लासेस ला प्राधान्य दिले जाते, असे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी सांगितले.
यूपीएससी-एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवून देतो,असा दावा करत विद्यार्थ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार बऱ्याचदा उघडकीस देखील आलेले आहेत.
तसेच यूपीएससी-एमपीएससी यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करून घेण्याबरोबरच यशाची खात्री देऊ, अशी जाहिरात करुन विद्यार्थ्यांची दिशाभूल करून गोरगरीब विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करण्यात काही क्लासेसवाले तर चांगलेच माहीर आहेत.
गावागावात क्लासेसचा बाजार…?
केवळ शहरांपुरते मर्यादित न राहता गावागावांतही आता स्पर्धा परीक्षांच्या क्लासेेसचे जाळे पसरले आहे. या परीक्षांसाठी एक विद्यार्थी किमान चार वर्षांचा वेळ देत असतो. कारण त्याच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय सरकारने शिल्लक ठेवलेला नाही, असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अनेक सरकारी नोकऱ्यांची उत्तम संधी विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध होत असतात, पण या संधी नेमक्या कशा मिळवाव्यात या विषयी हजारो विद्यार्थी अजूनही अंधारात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सरकारी नोकऱ्यांचे हे धनुष्य यशस्वीपणे कसे पेलावे याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची निर्मिती झाली आहे, हे जरी खरे असले तरी आपल्याला आज हे देखील मान्य करावे लागेल कि, स्पर्धा परीक्षेच्या कलाससेसच्या नावाखाली फक्त भरगच्च “फी” उकळायची आणि थातुर मातुर टाइम-पास करायचा.
या क्लासेस चा कहर इथवरच थांबत नाही तर, एक दोन वर्षांनी एम.पी.एस.सी. परीक्षा होतात यात बरेच विद्यार्थी चांगल्या रँक ने पास होतात मग यांना सर्वच क्लासेस मोटििव्हेशनल कार्यक्रमांसाठी आमंत्रित करतात, आणि हे माननीय नवीन अधिकारी प्रत्येक क्लासेसच्या कार्यक्रमाला सांगतात की, आम्हाला अमुक या सरांचे मार्गदर्शन लाभले, आमच्या यशात यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले आहे, तसे पहिले तर यावर बारकाईने संशोधन केले तर आपल्या लक्षात येईल कि संबंधित त्या क्लासेसचा अन् याचा काही एक संबंध नसतो. पण याला स्वागत, सन्मान सोहळा मिळतो मग काय करणार, त्या क्लासेस ची हवी तेवढी तोंडभरून वाहवाह ….करायची. पण याचे परिणाम माहित नसतात यांना…अशा मोटिव्हेशनल कार्यक्रमांना गोर गरीब शेतकऱ्यांची पोर लाखो स्व्वप्न उरााशीबाळगून आशा-अपेक्षा मनात ठेऊन येत असतात. कार्यक्रम पाहतात आणि त्या क्लासेस च्या जाळ्यात अडकतात. मग काय पुढे सुरु होतो तो प्रवास… ज्या प्रवासाचा अंत कधी होईल काहीच सांगता येत नाही.
आम्ही बऱ्याच अशा विद्यार्थ्यांच्या भेटी घेतल्यात, त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितले कि, क्लासेस म्हणजे फक्त एक्झाम पॅटर्न समजून घेण्यासाठी ठीक आहे. कारण एवढी फी घेऊन काय शिकवतात तेच तेच…पुन्हा ..पुन्हा..दुसरे महत्वाचे म्हणजे या क्लासेस मध्ये शिकवणारे शिक्षक बोटावर मोजण्या इतके सोडले तर बाकी काय शिकवताय त्या शिक्षकांनाच कळेना अशी हि परिस्थिती निर्माण झाली आहे.
जळगाव शहरात सुरवातीला स्पर्धा परीक्षेचे एक दोन क्लासेस होते. आणि पूर्वी सेवाभावी वृत्तीने व आवड म्हणून चालणारे क्लासेस लुप्त पावत गेले. आणि व्यावसायाचे रौद्र रूप घेऊन निर्माण झालेत हे स्पर्धा परीक्षा क्लासेस. कोणी वेल फर्निशेड क्लासरूम देत आहेत तर कोणी डिजिटल क्लासरुम देत आहेत. पण फी अव्वा च्या सव्वा वसूल करुन घेत आहेत.
या क्लासेसचा साधारणत: विचार केल्यास…. या क्लासेस सुरु झाल्यापासून ते आतापर्यंत यांनी किती आय.ए.एस., व किती आय.पी. एस. व किती जिहाधिकारी व उपजिल्हाधिकारी घडवलेत याचा नक्कीच विद्यार्थ्यांनी आढावा घ्यायला हवा.
आमच्या प्रतिनिधींनी काही शिक्षण तज्ञ् यांच्याशी देखील यावर चर्चा केली कि खरचं विद्यार्थ्यांची फसवणूक किंवा आर्थिक लूट होत आहे का? या खाजगी तुटपुंज्या क्लासेस कडून…. तर त्यांनी आम्हाला होकारच दिला. खरंच हा प्रकार थांबला पाहिजे. तसेच त्यांनी आम्हाला असेही सांगितले कि उच्चमाध्यमिक कॉलेज आहेत त्यांनीच त्यांच्या महाविद्यालयात रोज एक तास स्पर्धा परीक्षांसाठी राखीव करावा व विद्यार्थ्यांकडून पदवीचे शिक्षण होई पर्यंत अभ्यास करून घेतला पाहिजे. पण महाविद्यालयांना याची अजिबात चिंता नाही कि आपल्या विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य काय ? कारण की, महाविद्यालयांना भरगच्च अनुदान मिळते व शिक्षकांना वेळेवर पगार मिळतो त्यामुळेच तर क्लासेस वाल्यांची चांदी होण्यास फावत असते.
क्लासेस वर कोणाचे तरी नियंत्रण असले पाहिजेे. असेच सुरु राहिले तर क्लास संचालक आर्थिक गब्बर होतील व गरीब शेतकरी अजून जास्त कर्जबाजारी होतील. त्यामुळे पालकांनी व पाल्यांनी याबाबत नेहमी विचारपूर्वकच निर्णय घेतला पाहिजे. तेव्हाच या अशा काही क्लासेस वर तोडगा निघेल.
अशा विविध विषयांना वाचा फोडण्यासाठी “सत्यमेव जयते” जनतेशी कटिबद्ध आहे. सदैव नवनवीन घडामोडींच्या अपडेट साठी बघत रहा…www.satymevjayate.com