<
‘सन्मान कर्तृत्वा’चा सोहळ्यात अध्यक्ष भरत अमळकर यांचे प्रतिपादन
प्रसिद्धी माध्यमांमध्ये छायाचित्रकारांचे स्थान आणि भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. एखादे वृत्त, घटना किंवा क्षण अधिक विश्वसनिय होण्यात छायाचित्रकारांचा वाटा मोलाचा असतो. हे महत्त्व लक्षात घेवून छायाचित्रकारांनी आपली अंगभूत कला अधिक विकसित करावी, असे प्रतिपादन केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी केले.
केशवस्मृती सेवासंस्था समूहातर्फे शहरातील मुद्रित, इलेक्ट्रॉनिक्स, पोर्टल तसेच संबंधित क्षेत्रात कार्यरत अशा सुमारे ६५ छायाचित्रकारांचा जागतिक छायाचित्रण दिनाच्या पार्श्वभूमिवर शनिवारी, २० आणि रविवार, २१ रोजी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले.
यावेळी सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक प्रख्यात धावपटू तथा माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीचे संचालक किरण बच्छाव, जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तथा गोळवलकर रक्तपेढीचे संचालक सुनील भंगाळे प्रमुख पाहुणे होते, तर सर्जना मीडिया सोल्युशन्स प्रा. लि. चे कार्यकारी संचालक रवींद्र लढ्ढा, केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे उपाध्यक्ष नीळकंठ गायकवाड, सचिव रत्नाकर पाटील आणि माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे संचालक विजय डोहोळे उपस्थित होते. रवींद्र लढ्ढा यांनी प्रास्ताविकात छायाचित्रकारांच्या सन्मानामागील आयोजनाची भूमिका विशद केली.
कोणत्याही बातमीमधील छायाचित्र त्या बातमीचे वाचनमूल्य वाढवते, असे सांगून किरण बच्छाव म्हणाले की, फोटोविना बातमी अपूर्ण वाटते. त्यादृष्टिने छायाचित्र आणि छायाचित्रकारांचे महत्त्व कळते. उत्तम छायाचित्रकार असलेल्या आणि त्यासाठी पुरस्कारही मिळालेल्या किरण बच्छाव यांनी छायाचित्रणांचे आपले अनुभवही सांगितले.
दिवंगत छायाचित्रकारांचाही सन्मान
सध्या कार्यरत छायाचित्रकारांसोबतच कोरोना काळातील दोन दिवंगत छायाचित्रकारांचाही यावेळी मरणोत्तर सन्मान करण्यात आला. त्यात स्व. सूर्यभान पाटील यांचा सन्मान पत्रकार भगवान सोनार यांनी स्वीकारला. तसेच स्व. प्रेम लिंगायत यांचा सन्मान स्वीकारताना त्यांचे बंधू प्रकाश लिंगायत यांना अत्यंत गहिवरून आल्याने त्यांना अश्रू आवरणे अनावर झाले होते. त्यामुळे सभागृहातील वातावरणही काही काळ भारावून गेले होते.
सन्मानार्थी छायाचित्रकारांतर्फे ‘आवाज मराठी’चे अभिजीत पाटील, विद्यापीठातील शैलेश पाटील आणि ’इंडिया ३६५’ चे अयाज मोहसीन तसेच ‘एबीपी माझा’चे चंद्रशेखर नेवे यांनी सत्काराबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या भावना व्यक्त केल्या. केशवस्मृती समूहाने केलेला हा सन्मान त्यांच्या सेवाभावाचे प्रतीक असल्याचे सांगून असा सन्मान प्रथमच झाल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. या समूहात आकाशाच्या उंचीची कामे होतात पण त्याचा गाजावाजा मात्र केला जात नाही, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश दगडकर आणि मनोज महाजन यांनी केले, तर आभार संचालक संजय नारखेडे व छायाचित्रकार सुमित देशमुख यांनी मानले. या सन्मान सोहळ्याप्रसंगी केशवस्मृती सेवासंस्था समूहातील विविध प्रकल्पांमधील संचालक, पदाधिकारी आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.