<
चाळीसगाव – तालुक्यातील बोढरे येथील ज्योतीसिंग उर्फ ज्योतीलाल उखर्डू चव्हाण याची, जळगाव येथील तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. बी एस वावरे यांनी खूनप्रकरणी निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक २८-०६-२०१९ रोजी बोढरे ता. चाळीसगाव येथील पंडित रामदास सोनवणे यांचा सात ते आठ वयाचा मुलगा चिरंजीव ऋषिकेश हा संध्याकाळी सहा वाजता सुमारास गावातून अचानक गायब झाला. त्याचा, त्याच्या आईवडिलांनी व सर्व नातेवाईकांनी रात्रभर तपास केला असता, तो न सापडल्यामुळे दुसऱ्या दिवशी दि. २९-०६-२०१९ रोजी पंडित सोनवणे यांनी त्यांच्या मुलाचे अपहरण कोणीतरी अज्ञात इसमाने केल्याबाबतची फिर्याद चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली.
त्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला भा. दं. वि. कलम ३६३ प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
त्यानंतर दि.०५-०७-२०१९ रोजी चाळीसगाव-औरंगाबाद रोडवरील बोढरे फाट्यावरील रवींद्र रामदुलारे शुक्ल यांचे शेतामध्ये बांधावर एका खड्ड्यामध्ये एक पांढरी गोणी आढळून आली. त्या गोणीवर मोठ्ठा दगड ठेवलेला होता व त्यातून प्रचंड दुर्गंधी येत होती. त्याठिकाणी पोलीस आल्यानंतर पोलिसांच्या मदतीने तो दगड दूर करण्यात आला व त्या गोणीमध्ये ऋषिकेशचे मृत शरीर आढळून आले होते. त्याचे लिंग कापलेले होते, तसेच डोळेही गळून गेलेले होते. दोन्ही हात व दोन्ही पाय एका रिबनने बांधून मान खाली वाकवून एकत्र बांधून ते प्रेत गोणित कोंबून दगडाखाली पुरल्याचे दिसत होते.
त्यानंतर घटनास्थळाचा व प्रेताचा पंचनामा झाल्यानंतर ते प्रेत कुजलेले असल्याने त्याच ठिकाणी शवविच्छेदन करून पुरण्यात आले. सदर गुन्ह्याकामी पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३०२, ३६४, २०१ प्रमाणे गुन्हें कलम समाविष्ट करून पुढील तपास सुरू केला.
सदरचा गुन्हा घडूनही साधारण दीड महिन्यापर्यंत आरोपीचा सुगावा लागत नव्हता. सुरुवातीच्या तपासामध्ये सदरचा गुन्हा हा काही विकृत व अघोरी वृत्तीच्या २ ते ३ किंवा त्याहून अधिक लोकांनी केलेला असावा, या निष्कर्षाप्रत पोलीस आलेले होते. आरोपींचा सुगावा लागावा, म्हणून पोलिसांनी बोढरे या गावात, तसेच परिसरातील अन्य खेड्यांमध्ये रोज दवंडी पिटवून खुनी लोकांच्या माहितीचा धागादोरा देणाऱ्यास एक लाख रुपये बक्षीस देण्याचे जाहीर केले होते. तसेच त्याबाबतचे पोस्टर्सही बोढरे गावात, तसेच परिसरातील गावांमध्ये चिटकवण्यात आलेले होते.
पोलिसांनी या गुन्ह्याकामी बोढरे गावातील अनेक लोकांना वेळोवेळी संशयावरून उचलून पोलीस स्टेशनला नेले होते. आरोपीचा सुगावा लागत नसल्यामुळे नाशिक येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही बोढरे गावाला भेटी देऊन तपास कामाचा आढावा घेतला होता. त्यानंतर, पोलिसांनी गावातील कृष्णा नथ्थू सोनवणे, जो फिर्यादी पंडित सोनवणे याचा नात्याने पुतण्या आहे, त्याच्या दि.१७-०८-२०१९ रोजीच्या जबाबाच्या आधारे, तसेच फिर्यादी पंडित सोनवणे याची पत्नी सौ. चित्राबाई पंडित सोनवणे हिच्या दि.२४-०८-२०१९ रोजीच्या पुरवणी जबाबाच्या आधारे, या खुनाच्या कारणासाठी आरोपी ज्योतीसिंग उर्फ ज्योतीलाल उखर्डू चव्हाण याला दि.३१-०८-२०१९ रोजी अटक करून चाळीसगाव न्यायालयापुढे हजर केले व त्याची दि.०७-०९-२०१८ पर्यंत पोलीस कोठडी घेतली. त्यानंतर त्यास न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते.
सदर खटला चौकशीकामी सरकारपक्षातर्फे फिर्यादी पंडित सोनवणे, त्याची पत्नी चित्राबाई पंडित सोनवणे, आरोपी ज्योतीसिंग व मयत ऋषिकेश यांना दि.२८-०६-२०१९ रोजी संध्याकाळी शेवटचे एकत्र पाहणारे साक्षीदार कृष्णा नथू सोनवणे व साक्षीदार पितांबर शिवराम जाधव, तसेच घटनास्थळ पंच, प्रेताचा पंचनामा करणारे पंच, आरोपीकडून चाकूची व मोटरसायकलची जप्ती करणारे पंच, प्रेतावर पोस्टमार्टम करणारे डॉ. बापू बाविस्कर, प्रेताचे डीएनए साठी सॅम्पल ताब्यात घेणारे डॉ. मकरंद करंबेळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, आरोपीने खून केल्याबाबत करून दाखवलेल्या प्रात्यक्षिकाचे व्हिडिओ चित्रीकरण करणारे पोलीस नाईक शांताराम पवार व पोलीस नाईक महेंद्र साळुंखे आणि गुन्ह्याचे तपासकाम करणारे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांचेसह एकूण २६ साक्षीदार तपासण्यात आले.
याप्रकरणी, सुरुवातीलाच दि.०५-०७-२०१९ रोजी मयत ऋषिकेशचे प्रेत सापडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दि.०६-०७-२०१९ रोजी बोढरे गावातील भाईदास मधु जाधव याचे घरातून पोलिसांनी त्याचे घरातील कपाटाखालून एक फिक्कट हिरव्या रंगाची रक्ताने भरलेली मळकट निकर, तसेच तीन पांढऱ्या गोण्या, भाईदास जाधव याचे घरातील भिंतीवर पडलेल्या रक्ताचे डाग अशा आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या होत्या व त्याबाबतचा पंचनामा करून त्या सर्व वस्तू फॉरेन्सिक लॅब नाशिक येथे पाठवण्यात आलेल्या होत्या. तसेच भाईदास मधु जाधव याला अटक करून सुरुवातीला ताब्यातही घेण्यात आले होते.
तथापि, त्यानंतर पोलिसांनी भाईदास मधू जाधव याला कोणतेही कारण न देता सोडून दिले होते. तसेच त्याच्या घरातून जप्त केलेल्या वर नमूद आक्षेपार्ह वस्तूंचा कुठलाही समावेश दोषारोपपत्रात केला नव्हता. या सर्व महत्त्वपूर्ण बाबीं बचावपक्षाने उलटतपासणीचे वेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिल्या होत्या. तसेच प्रेताच्या अंगावर जो मोठा दगड सुरुवातीला आढळून आला होता, तो दगड उचलण्यास किंवा सरकावण्यास कमीत कमी २ ते ३ किंवा त्याहून अधिक लोकांची गरज होती, असे अनेक साक्षीदारांनी त्यांच्या उलट तपासणीच्यावेळी मान्य केले होते. त्याचप्रमाणे मयत व आरोपी यांना दिनांक २८-०६-२०१९ रोजी शेवटचे एकत्र पाहणारे तथाकथित साक्षीदार कृष्णा नथू सोनवणे व पितांबर शिवराम जाधव हे दोघेही घटना घडल्यानंतर तब्बल दीड महिना उशिरापर्यंत गप्प का होते? त्यांनी एवढी गंभीर बाब गावातील लोकांना व पोलिसांना इतक्या उशिरापर्यंत का सांगितली नव्हती? तसेच, फिर्यादी पंडितची पत्नी हीने स्वतःच्या मुलाबाबत ईतकी वाईट घटना घडुनही तब्बल पावणेदोन महिना उशीरापर्यंत आरोपींविरुद्ध पोलीसांना माहिती का दिली नव्हती? याबाबत आरोपीतर्फे उपस्थित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांना सरकारपक्षातर्फे कोणतेही उत्तरें देण्यात आली नव्हती. या, तसेच इतर अनेक महत्त्वपूर्ण कायदेशीर बाबी न्यायालयासमोर आरोपीतर्फे बचाव करताना बचाव पक्षातर्फे पुराव्यासह सादर केल्या गेल्यामुळे, न्यायालयाने आरोपी ज्योतीसिंग उर्फ ज्योतीलाल उखर्डु चव्हाण याची निर्दोष मुक्तता केली.
आरोपीतर्फे बचावाचे काम जळगाव येथील ॲड. वसंत आर ढाके यांनी पाहिले. त्यांना ॲड. प्रसाद वसंत ढाके आणि ॲड. निरंजन वसंत ढाके, ॲड. सौ. भारती वसंत ढाके, तसेच ॲड. श्याम जाधव यांनी सहकार्य केले.