<
जळगाव – (प्रतिनिधी) – गणरायाचे शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी अत्यंत जलोष आणि उत्साहात विसर्जन करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत विसर्जन मिरवणूक सुरु होती. यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो. ते लक्षात घेता विसर्जनानंतर हा संपूर्ण मार्ग स्वच्छ करण्याचे काम केशवस्मृती सेवासंस्था समुह आणि विवेकानंद प्रतिष्ठान हे गेल्या काही वर्षांपासून करीत आहे. त्यानुसार शनिवार दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी ७:३० वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते टॉवर चौक पर्यंतचा संपूर्ण भाग विवेकानंद प्रतिष्ठान मधील ४०० विद्यार्थी आणि समूहातील १५० च्यावर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कार्यकर्त्यांनी स्वच्छ केला. गणेश विसर्जनानंतर लगेचच सकाळी लवकर झालेल्या यास्वच्छता मोहिमेमुळे या मार्गावरील नागरिकांनी यासर्व उपक्रमाचे कौतुक केले.
गणेश विसर्जन कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात लोक बाहेरून येत असतात. शहराला त्यामुळे जणू यात्रेचे स्वरूप आलेले असते. अनेक ठिकाणी खाद्य पदार्थाचे स्टॉल आणि विविध वस्तूंच्या विक्रीची दुकाने लागलेली असतात तसेच विसर्जन मिरवणुकीत खूप मोठ्या प्रमाणात फुलाच्या पाकळया आणि गुलालही उधळला जातो. यामुळे या परिसरातील रहिवाशांना त्रास होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊनच केशवस्मृती सेवासंस्था समुहाने व विवेकानंद प्रतिष्ठान मधील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कमर्चारी तसेच समूहातील कार्यकर्त्यांनी हा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचे अभियान मागील काही वर्षांपासून सुरु केले आहे तसेच ते शनिवारीही सकाळी ७:३० वाजल्या पासून राबविण्यात आले. त्यात खाद्य पदार्थाचे रिकामे पाकिटे, पेपर ग्लास, डिश व कप, रद्दी कागद, प्लास्टिकच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या व पाउच, फुलाच्या पाकळया आणि गुलाल आदी स्वच्छ करून व तो वाहनात भरून हा संपूर्ण भाग स्वच्छ केला. त्यासाठी महापालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचारी व अधिकारी यांची मोलाची मदत झाली. यावेळी संपूर्ण आरोग्य विषयक काळजी घेण्यात आली होती. स्वच्छता करतांना सर्वांनी मास्क परिधान केला होता आणि हातात हॅन्डग्लोज हि घातले होते. स्वछतेनंतर हात सॅनिटाईज करण्याकडेही लक्ष देण्यात आले होते.
विशेष म्हणजे शनिवार हा या परिसरातील बाजाराचा दिवस आहे. बाजारासाठी आलेल्या ग्राहकांना हि स्वच्छता पाहून अक्षरशः आश्चर्याचा धक्का बसला. कारण कालची विसर्जन मिरवणूक आणि आजची हि स्वच्छता म्हणजे केशवस्मृती सेवासंस्था समुहाच्या सेवाभावाचे अनुकरणीय उदाहरण असल्याची भावना या परिसरातील नागरिक, व्यापारी आणि ग्राहक आदींनी व्यक्त केली.