<
जळगाव-(प्रतिनिधी) – सावदा, ता. रावेर येथील अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत बनावट कागदपत्रे तयार करून तीन शिक्षकांची बोगस भरती करुन शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जळगाव जिल्हापरिषदेतील तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर जगन्नाथ पाटील यांना भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. यु. एम. पडवड यांनी रुपये २५,०००/- हजाराचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.
आरोपी शिक्षणाधिकारी भास्कर जगन्नाथ पाटील यांच्यातर्फे जळगाव येथील ॲड. वसंत आर ढाके यांनी त्यांची बाजू मांडली. त्यांना ॲड. प्रसाद वसंत ढाके व ॲड. निरंजन वसंत ढाके यांनी सहकार्य केले. सरकारतर्फे ॲड. मोहन देशपांडे यांनी अटकपूर्व जामीनकामी विरोध केला होता.
थोडक्यात हकीकत अशी की, सावदा ता. रावेर येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी या संस्थेअंतर्गत अँग्लो उर्दू हायस्कूलचे माजी अध्यक्ष शेख हारून शेख इकबाल यांनी सावदा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, ते सदर संस्थेचे सन २००४ ते २०१९ पर्यंत अध्यक्ष होते. या संस्थेअंतर्गत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शाळा चालविली जाते.
जानेवारी २०१९ मध्ये फिर्यादी हा सदर संस्थेचा अध्यक्ष असताना आरोपी सचिव शेख सुपडू शेख रशीद मंसुरी, स्कूल कमिटी चेअरमन समीर दगडू बागवान (सध्या मयत) आणि संस्थेच्या सचिवाचा भाऊ शेख हनीफ शेख रशीद मंसूरी हे तिघेही आरोपी फिर्यादीकडे आले व त्यांनी त्याला सांगितले की, आमचे जळगावच्या जिल्हापरिषदेचे शिक्षणाधिकारी यांच्याशी आरोपी शिक्षक दानिश शेख सागीर भगवान, शेख सलीम शेख सुपडू पिंजारी व शेख जब्बार शेख सलीम कुरेशी या तीन शिक्षकांच्या सन २०१२ ते २०१५ मध्ये शिक्षणसेवक कालावधी मान्यतेपर्यंतचे बोलणे झालेले आहे आणि त्याबाबतचे कागदपत्रे त्यांनी तयार करून घेतलेली आहेत, आता फक्त तुमची म्हणजे फिर्यादीची मान्यता हवी आहे. तेव्हा फिर्यादीने त्यांना सांगितले की, तुमच्या दोघांची मुलें तर मागील एक-दोन वर्षापासून औरंगाबाद येथे बीएड करत आहे, त्यांचे शिक्षण पूर्ण होऊ द्या, जर आपण असे केले तर तुमच्यासह मी पण अडचणीत येईल, त्यामुळे मी तुमच्या प्रस्तावावर सही करू शकत नाही. सदर प्रस्तावास तत्कालीन मुख्याध्यापक यांनीदेखील विरोध केला होता.
सदर प्रस्तावास फिर्यादीने विरोध केल्यावरही वर नमूद तीनही आरोपी म्हणजे सचिव स्कूल कमिटी स्कूल कमिटी चेअरमन, सचिव व सचिवाचा भाऊ या तिघांनी मिळून तत्कालीन मुख्याध्यापक व फिर्यादी यांच्या बनावट सह्या करून खोटी कागदपत्रे बनवून तीनही शिक्षकांचे २०१२ ते २०१५ या कालावधीतील शिक्षणसेवक कालावधी पूर्ण केल्याची अनुदानित तत्त्वावर दि.१९-०९-२०१९ रोजी आरोपी शिक्षणाधिकारी भास्कर जगन्नाथ पाटील यांच्याशी संगनमत करून बोगस मान्यता प्राप्त करून घेतली व शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केली, अशा स्वरूपाची फिर्याद दाखल झाल्यावर सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०/२०२२ अन्वये कलम ४२०, ४०६, ४०९, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१, २०१, १२०-ब व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.
सदर गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी भास्कर जगन्नाथ पाटील, शिक्षणाधिकारी जिल्हापरिषद जळगाव यांनी भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात फौजदारी जामीन अर्ज क्रमांक ३०५/२०२२ प्रमाणे जामीन अर्ज दाखल केला होता. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी शिक्षणाधिकारी भास्कर जगन्नाथ पाटील यांना रु.२५,०००/- चा अटकपूर्व जामीन मंजूर केला.