<
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज होणार शुभारंभ
दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या मोहिमेत जनतेने सहभाग नोंदवण्याचे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री गुलाबराव पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्री पंकज आशिया यांनी केले आहे
जळगाव दि.15(प्रतिनिधी): दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा ही मोहीम जिल्हाभरात आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज शुभारंभ होणार असून यावर्षी “गावांची दृष्यमान स्वच्छता” ही या मोहिमेतील प्रमुख थीम आहे.हे अभियान संपूर्ण 1153 ग्रामपंचायत मध्ये राबविण्यात येणार आहे.या अभियानात सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्री पंकज आशिया यांनी केले आहे.
जिल्ह्यात शाश्वत स्वच्छता राहावी आणि निरोगी गाव निर्माण व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार दिनांक 15 सप्टेंबर ते दिनांक 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत स्वच्छता ही सेवा गावांमध्ये दृष्यमान स्वच्छतेसाठी एक राज्यव्यापी मोहिम राबविण्याबाबतच्या केंद्र शासनाकडून सूचना प्राप्त झालेल्या आहेत.सदरील मोहिमेत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे यात गावांमध्ये दृष्यमान स्वच्छता,गावातील कचराकुंड्या आणि असुरक्षित ठिकाणांची साफसफाई करणे,कचरा स्त्रोतांच्या ठिकाणी कचरा विलगीकरण करण्यासाठी जनजागृती करणे,कचरा संकलन आणि कचरा विलगीकरण करण्यासाठी केंद्र निर्माण करणे,प्लास्टिक सारखा अविघटनशील कचरा एकत्रित करून नियोजन करणे,पाणवठ्या जवळील परिसर स्वच्छ ठेवून त्यांच्या सभोवताली वृक्षारोपण, एकल प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामाबद्दल सभा आयोजित करून यापूर्वी प्लास्टिक वापरावर बंदी बाबत घेतलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे,हागणदारी मुक्त अधिक घटकांवर सरपंच संवाद आयोजित करणे, घोषवाक्य लेखन, प्रतिज्ञा घेणे,कचरा न करणे ,प्लास्टिक बंदी व स्वच्छता या विषयावर वकृत्व निबंध, रांगोळी सजावट व देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी गणेश मंडळांना आवाहन करणे असे उपक्रम राबविण्यात येणार आहे.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्री पंकज आशिया यांनी तालुकास्तरावर गटविकास अधिकारी , सरपंच, सदस्य, गावातील सामाजिक संस्था आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन हे अभियान यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले आहे.सदरील अभियानाचे नियोजन प्रकल्प संचालक जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन श्रीमती स्नेहा कुडचे यांनी केले असून अभियान यशस्वीतेचे आवाहन केले आहे.