<
औषधशास्त्र विभागातर्फे “राष्ट्रीय औषध सतर्कता सप्ताह” निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : लोकांकडून अनेकदा औषधांचा खेळ सुरु असतो. डॉक्टरपेक्षा लोक स्वतःला औषधशास्त्राचे जाणकार समजतात. आजारी पडले कि वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधी घेतात. त्यामुळे अनेकदा शरीरात होणारे दुष्परिणाम त्यांना समजून येत नाही. त्यामुळे लोकांनी स्वतःला डॉक्टर समजून स्वतःवर वैद्यकीय प्रयोग करणे बंद करावे असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.
येथील औषधशास्त्र विभागातर्फे “राष्ट्रीय औषध सतर्कता सप्ताह” निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धांचे उद्घाटन अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, शरीररचना शास्त्र विभाग प्रमुख डॉ. अरुण कसोटे, औषधशास्त्र विभाग प्रमुख डॉ. इमरान तेली उपस्थित होते. मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
प्रस्तावनेमधून डॉ. इमरान तेली यांनी कार्यक्रम घेण्याविषयीचा उद्देश स्पष्ट करीत विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वाढीस लागावे हा हेतू सांगितला.अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळामध्ये अनेक नागरिकांनी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय विविध पॅथीच्या औषधी घेतल्या. मात्र त्याचे साईडइफेक्ट देखील दिसून आले. औषधांच्याबाबत अनेकदा गुंतागुंत आढळते. रुग्णाला योग्य औषधी लिहून देण्याबाबत डॉक्टरांचे कौशल्य पणास लागते. औषधशास्त्र विषयात करिअर आणि संशोधनाला मोठा वाव आहे, विद्यार्थ्यांनी यासाठी पुढे आले पाहिजे असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. संजय बनसोडे, डॉ. वैभव सोनार, डॉ. प्रवीण शेकोकार, डॉ. संदीप पटेल डॉ. मनोज पाटील, डॉ. विलास मालकर, डॉ. दिव्या शेकोकार, डॉ. डॅनियल साजी, जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन फिझा चौधरी, श्रेया गाग यांनी तर आभार डॉ. रितेश सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. राजू चव्हाण, डॉ. शिल्पा मिश्रा, हेमंत जोशी, कुणाल चांदेलकर, उषा सोनार, उषा गोसावी, अर्चना ठाकूर, विद्या सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.
दिवसभरात पोस्टर, प्रश्नमंजुषा स्पर्धा
औषधशास्त्र विभागातर्फे “राष्ट्रीय औषध सतर्कता सप्ताह” निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी पहिल्या दिवशी पोस्टर स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. पोस्टर्स स्पर्धेत ४० संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षण डॉ. मारुती पोटे आणि डॉ. विलास मालकर यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विषय घेऊन लघुसंशोधन पोस्टर्सद्वारे सादर केले. विद्यार्थ्यांच्या सृजनशील कल्पनेला यावेळी मान्यवरांनी दाद दिली. तर दुपारी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे परीक्षण डॉ. इमरान तेली आणि डॉ. रितेश सोनवणे यांनी केले. या स्पर्धेत चार संघ सहभागी होते. औषधशास्त्र विषय घेऊन विविध प्रश्नांचे अत्यंत गुणवत्तेने विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली.