<
जळगाव – रेडक्रॉस जळगाव करीत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती मला मिळत असून अतिशय उत्कृष्ठ कार्य सुरु आहे तरी मी महाराष्ट्रातील इतर रेडक्रॉस शाखांनी रेडक्रॉस जळगावचा आदर्श घ्यावा अशा शब्दांत रेडक्रॉस राज्य शाखेचे अध्यक्ष महामहीम मा.श्री.भगतसिंग कोश्यारी यांनी रेडक्रॉस जळगावच्या कार्याचे कौतुक केले.
महाराष्ट्रातील रेडक्रॉसच्या सर्व शाखांची वार्षिक सर्व साधारण सभा रेडक्रॉस राज्य शाखेचे अध्यक्ष महामहीम मा.श्री.भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राज भवन येथे उत्साहात पार पडली. याप्रसंगी राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, राज भवनातील प्रमुख सेक्रेटरी श्री. संतोष कुमार, रेडक्रॉस राज्य शाखेचे चेअरमन श्री. खुसरो खान, रेडक्रॉसचे जनरल सेक्रेटरी श्री.टी.बी.सकलोथ,रेडक्रॉस जळगावच्या वतीने रेडक्रॉसचे चेअरमन श्री. विनोद बियाणी, आपत्ती व्यवस्थापन चेअरमन श्री.सुभाष सांखला व सर्व रेडक्रॉस शाखांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
याप्रसंगी महाराष्ट्रातील सद्य परिस्थितीत आवश्यक असलेल्या सामाजिक उपक्रमांविषयी चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने जास्तीत जास्त कोविड लसीकरण करणे, टी,बी.मुक्त भारत करण्यासाठी सर्व रेडक्रॉस शाखांनी प्रयत्न करणे,तालुका स्तरावर रेडक्रॉसच्या शाखा स्थापन करून ग्रामीण भागापर्यंत सामाजिक उपक्रम राबविणे इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. रेडक्रॉसचा जन्म हा मानवतावादी दृष्टीकोनातून झाला असून प्रत्येक गरजू व्यक्तींपर्यंत आवश्यक सेवा पोहोचविणे हेच रेडक्रॉसचे प्रमुख उद्दिष्ट आहे. याच भूमिकेतून सर्व शाखांनी काम करावे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये व्यापक सामाजिक उपक्रम राबवावे असे आवाहन रेडक्रॉस राज्य शाखेचे अध्यक्ष महामहीम राज्यपाल मा.श्री.भगतसिंग कोश्यारी यांनी केले. जळगाव भेटी दरम्यान रेडक्रॉसच्या सेवा उपक्रमाची माहिती मी जाणून घेतली असून सामाजिक जाणीवेतून सेवाकार्य सुरु आहे अशा भावना व्यक्त करत जळगाव रेडक्रॉसच्या सेवाकार्याचा विशेष उल्लेख करून जळगाव रेडक्रॉसचे अभिनंदन केले. याप्रसंगी रेडक्रॉस जळगाव शाखेचा कार्य अहवाल माहितीस्तव देण्यात आला.