<
जळगाव – (प्रतिनिधी) – केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित ललित कला संवर्धिनी आयोजित यावर्षीचा भुलाबाई महोत्सव शनिवार,२४ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात अत्यंत उत्साहात साजरा झाला. खान्देश लोकसंस्कृतीचा जागर करणाऱ्या या महोत्सवाचे यंदा २० वे वर्ष होते.
खान्देशातील लोकसंस्कृतीमध्ये भुलाबाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भुलोजी आणि भुलाबाईला साक्षात शंकर आणि पार्वतीचे रूप मानून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. यानिमित्ताने सायंकाळी मुली एकत्रित येवून भुलाबाईचे गाणे सादर करीत घरोघरी जातात. या माध्यमातून एकमेकींचे नाते आणि एकोपा टिकण्यास मदत होत असे. परंतु काळाच्या ओघात या लोकपरंपरेला उजाळा अशा उत्सवाने होतो. अशा या उत्सवाचे महत्त्व जाणून केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित ललित कला संवर्धिनी च्या माध्यमातून या उत्सवाचे आयोजन करण्यात आले .
या महोत्सवासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून *डॉ .सौ अमृता प्रवीण मुंढे त्वचा रोग तज्ञ व *स्वप्ना लिंबेकर भट* मराठी चित्रपट सृष्टीतील सहकलाकार , केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव श्री. रत्नाकर पाटील , ललित कला संवर्धिनीचे प्रमुख श्री. पीयूष रावल, भुलाबाई महोत्सव प्रमुख सौ. रेवती कुरंभट्टी , मनिषा खडके आदी उद़घाटनप्रसंगी उपस्थित होते .
प्रमुख पाहुण्या सौ. अमृता मुंढे यांनी भुलाबाई उत्सवाचे कौतुक करुन , सहभाग घेऊन व सर्वांनी एकत्र येऊन लोकपरंपरा व संस्कृती जतन करावी असा संदेश दिला . तसेच कला अंगी असेल तर कोणतीही व्यक्ती जीवनात अधिक आनंदी राहतो. नव्याने एका समृद्ध संस्कृतीची ओळख झाली असेही स्वप्ना लिंबेकर भट यांनी सांगितले .
या कार्यक्रमात भुलाबाईची आरती अंजली हांडे यांनी म्हटली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
मीना जोशी , सोनाली जाधव , सानिका पंचभाई , वैदेही नाखरे , आनंदी याज्ञिक , वैष्णवी जोशी , शर्वा जोशी , पीयुषा जाधव या सदस्यांनी केले .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यक्रम प्रमुख सौ.रेवती कुरंभट्टी यांनी केशवस्मृती प्रतिष्ठानची लोकसंस्कृती जपण्याची भूमिका स्पष्ट केली. आभार स्वाती फिरके यांनी मानले .
कार्यक्रमासाठी स्मृतिचिन्हकरिता श्री. सचिन चौघुले यांनी सहाय्य केले. बक्षिसांची घोषणा सानिका पंचभाई व वैदेही नाखरे यांनी केली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी डॉ .केतकी पाटील , निना अशोक कोळी व रेखा पाटील पिंक रिक्षा चालक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते . कार्यक्रमाची सांगता प्रांजली रस्से यांनी सादर केलेल्या पसायदानाने झाली . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भुलाबाई समितीतील प्रतिमा याज्ञिक , प्रीती झारे ,मिना जोशी , राजश्री रावळ , रेवती कुरंभट्टी , रेखा पाटील , सुनिता पाटील , अलका सोनवणे , विद्या कलंत्री , चारुलता महाजन , संध्या पाटील , अपर्णा पाटील , अनिताताई वाणी , सौ. साधना दामले , वंदना पाटील , स्वाती महाजन , स्वाती फिरके,केशवसमृती प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी सागर येवले , नितीन नेमाडे आणि सदस्यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
या महोत्सवात एकूण ३१ संघाचा सहभाग होता .
खुल्या गटात सर्वांनी भुलाबाईचे गीत व त्यावर नृत्य सादर केले. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महिला व मुलीनी भुलाबाईच्या पारंपरिक लोकगीतांचा समावेश भुलाबाई महोत्सवात केला. मुली व महिलांनी या उत्सवात हिरीरीने सहभाग नोंदवून मनसोक्त आनंद लुटला. यामध्ये ५ ते १० वयोगटाचा एक गट तर ११ ते १६ वर्षे दुसरा गट होता. यापुढील गट खुला गट असे नियोजन करण्यात आले होते . या स्पर्धेचे परीक्षण तनया पाटील कथ्थक विशारद , दिपाली पाटील शिक्षिका नेरी , प्रिया देशपांडे आकाशवाणी वक्ता , लक्ष्मी परांजपे समन्वयक ,ला.ना . सार्वजनिक शाळा , आरती चौधरी, चाईल्ड कौन्सिलर, मंजुषा राव, सुरभि बहुउद्देशिय मंडळ (जळगाव ) यांनी केले . स्पर्धेत प्रत्येक गटास प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी बक्षिसे देण्यात आली .
बक्षीसपात्र संघांची नावे अशी
लहान गट ( ५ ते १०वर्ष )
प्रथम पारितोषिक : अच्युतराव अत्रे गट, जळगाव .
द्वितीय पारितोषिक – विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम गट, जळगाव ,
तृतीय पारितोषिक : कौमुदी गट
उत्तेजनार्थ प्रथम : क्रांती गट ,
उत्तेजनार्थ व्दितीय : तानाजी मालुसरे, सेवावस्ती
मोठा गट :
प्रथम पारितोषिक : ब. गो. शानभाग विद्यालय,
व्दितीय पारितोषिक : प . न. लुंकड कन्या शाळा .
तृतीय पारितोषिक : अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल ,
उत्तेजनार्थ : रोझलॅण्ड इंग्लिश मिडीयम .
खुला गट :
प्रथम विजेते : नेवे महिला मंडळ,
व्दितीय विजेते : प्रगती विद्या मंदिर ,
तृतीय विजेते : पोतदार इंटरनॅशनल स्कूल, जळगाव
उत्तेजनार्थ : महर्षी वाल्मिक नारी शक्ती सेवा संघ
महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी सकाळी भुलाबाईची वाजत गाजत मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी काढण्यात आली. यावेळी डॉ अमृता मुंढे, स्वप्ना लिबेकर-भट यांची उपस्थिती होती.