<
जळगाव – (प्रतिनिधी) – सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागामार्फत संपूर्ण राज्यभर दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर दरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा साजरा केला जात असून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून सहायक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांच्या वतीने दिनांक १ ऑक्टोबर २०२२ रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमाचे आयोजन सकाळी १०.०० ते १.०० या कालावधीत अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे करण्यात येत आहे.
सहायक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात १ ऑक्टोंबर रोजी जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात येत असून त्या माध्यमातून विविध व्याख्यान व उपक्रम यांचे आयोजन करून जेष्ठ नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असते. यावर्षी देखील समाज कल्याण विभागाकडून सदर दिनाचे औचित्य साधून “संध्याछाया” विषयावर मानसोपचार तज्ञ डॉ. प्रदीप जोशी, “मधुमेह आणि जीवनशैली” डॉ. ज्योती गाजरे, तर “जेष्ठांसाठी सायबर सुरक्षा” या विषयावर अॅड. चैतन्य भांडारी यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान तृतीय पंथीयांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणेकामी ओळखपत्राचे वाटप प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तरी सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी तसेच जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. योगेश पाटील यांनी केले आहे.