<
भडगांव – (प्रतिनिधी ) – आपल्या महापुरुषांनी उदात्त ध्येय समोर ठेवून समाजासाठी मोठे कार्य केले. त्यांनी प्रचंड कर्तृत्व गाजवले. परंतु आपण त्यांच्या चरित्रांमध्ये कपोलकल्पित कथांचा भरणा केला. त्यामुळे त्यांचे कर्तृत्व झाकोळल्या जाण्याची शक्यता निर्माण होते. महापुरुष हे दैवी नसून ती आपल्यासारखीच हाडामांसाची माणसे होती व त्यांनी प्रचंड कष्ट घेऊन अलौकिक कर्तृत्व गाजवले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, स्वामी विवेकानंद या महापुरुषांनी वेगवेगळ्या माध्यमातून भारतीय समाज उन्नत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. म्हणूनच या महापुरुषांचे आपण सतत कृतज्ञतेने स्मरण केले पाहिजे, असे प्रतिपादन पाचोऱ्याचे तहसीलदार कैलास चावडे यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात ते वक्ते म्हणून बोलत होते. ‘आम्ही आणि आमचे महापुरुष’ या विषयावरील व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एन.एन. गायकवाड होते.
प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक विजय देशपांडे व पाचोरा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील उपस्थित होते.
राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती अशा विविध गोष्टी मानवी आयुष्य समृद्ध करते. या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या महापुरुषांनी आपले विचार आणि कार्य पेरुन ठेवले आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरते. कुठलीही आधुनिक साधने उपलब्ध नसताना महापुरुषांनी केलेले कार्य हे अलौकिक आहे. त्यांच्या या कार्यामुळेच आपला समाज हा अधिक उन्नत झाला. त्यामुळे त्यांच्या विचारांची ज्योत सतत तेवत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी सौ. सु.गि. पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वास साळुंखे व शिक्षक बंधू भगिनी, लाडकूबाई माध्यमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका वैशाली पाटील, जनकल्याण सिनियर सिटीजन संस्थेचे पदाधिकारी, शैलेश चव्हाण, प्रतिभा कुलकर्णी, प्रा.पी.डी.पाटील, प्रा.एल.जी.कांबळे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. दीपक मराठे यांनी केले. सूत्रसंचालन कार्यक्रम समन्वयक डॉ. अतुल देशमुख यांनी केले तर उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील यांनी उपस्थितांचे मानले.