<
जळगांव(प्रतिनिधी)- परिवर्तन अभिवाचन महोत्सवाच्या पाचव्या पर्वातील दुसऱ्या पुष्पात शंभू पाटील लिखित व दिग्दर्शित ‘गांधी नाकारायचाय’ या नाटकाचे अभिवाचन आयोजित करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे दैनिक लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, आर्किटेक्ट शिरीष बर्वे, महावीर क्लासेसचे नंदलाल गादीया व नगरसेवक-रंगकर्मी अनंत जोशी उपस्थित होते. अभिवाचनाच्या माध्यमातून सहज गमतीत सुरू झालेली चर्चा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना समाज न्यायालयात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करते. त्यांच्यावर खटला चालवला जातो. त्यांच्यावर विविध आरोप करण्यात येतात त्यांच्या गांधींच्या माध्यमातून आपलं इतिहासाचं आकलन, एकूणच आपले समज, समाजमाध्यमातून पसरलेले गैरसमज आणि आपल्या वैचारिक गोंधळामुळे एकूणच गोंधळाची झालेली निर्मिती हलक्या फुलक्या चिमट्या घेत, शेरे बाजी करत वाचन करणाऱ्या कलाकारांनी प्रेक्षकांना हसवले, अंतर्मुख केलेत. ज्यावर लाखभर पुस्तकं लिहिली गेलीत तो गांधी न वाचता आपण ऐकीव माहितीवर आपण आपल्या मनात गांधींची चुकीची प्रतिमा उभी करत राहतो, इथपर्यंत प्रेक्षक येऊन पोहचतो.विजय जैन यांचा गांधी प्रेक्षकांची मने जिंकून घेतलीत मंजुषा भिडेंची महिला प्रतिनिधी, मंगेश कुलकर्णीचा कर्मठ म्हातारा, नारायण बाविस्कर, होरीलसिंग राजपूत यांनी सामान्य माणूस तंतोतंत प्रेक्षकांच्या मनात उभे केले.सदर नाट्याची मूळ संकल्पना व नाट्य रूपांतरण शम्भू पाटील, दिग्दर्शन तरुण दिग्दर्शक योगेश पाटील, नेपथ्य राहुल निंबाळकर, प्रकाश योजना मंगेश कुलकर्णी यांनी केले.गोळ्या झाडून पुतळे तोडुनही जो संपायला तयार नाही तो गांधी ऐकायला प्रेक्षकांनी या महोत्सवाला जबरदस्त प्रतिसाद दिला, खुर्च्यां अभावी अनेक प्रेक्षक दाटीवाटीने उभे राहिले व बरेच लोक परतही गेले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप केदार यांनी केले, निर्मिती वसंत गायकवाड आणि नेपथ्य-संगीत राहुल निंबाळकर व श्रद्धा कुलकर्णी तर प्रकाश योजना अक्षय नेहे यांनी केली. उद्या भारत सासणे अनुवादित अब्दुल बिस्मिल्लाह ह्यांच्या दंतकथेचे अभिवाचन करण्यात आलेले आहे, तरी उपस्थितीचे आव्हान परिवर्तनतर्फे करण्यात आले आहे.