<
पाचोरा – (प्रतिनिधी) – तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती तथा महान शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. मराठी विभाग व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने यानिमित्त ‘चला जाऊ नियतकालिकांच्या भेटीला’ हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड होते.
तरुणांमध्ये वाचनाचे कमी होत चाललेले प्रमाण हे चिंताजनक आहे. त्यादृष्टीने हे प्रमाण वाढावे म्हणून विद्यार्थ्यांना विविध नियतकालिकांची ओळख व्हावी, नियतकालिकांच्या विविध प्रकारांची माहिती व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दैनिक, साप्ताहिक, मासिक, ट्रैमासिक, वार्षिकांक यांची रचना, त्यांचे महत्व, वैशिष्ट्ये यांची विद्यार्थ्यांना या उपक्रमातून माहिती मिळाली.
याप्रसंगी प्रमुख अतिथी व्ही. टी. जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारतासाठी फार मोठे योगदान दिले आहे. तरुणांना ‘व्हिजन २०२०’ असे स्वप्न दाखवले आणि त्यासाठी जिद्दीने परिश्रम करण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. भारताला अण्वस्त्रसज्ज केले. त्यामुळेच भारताची वाटचाल विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे वाटचाल सुरु आहे. प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल देशमुख यांनी केले. ग्रंथपाल प्रा. आर. एम. गजभिये यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला नॅक समन्वयक डॉ. ए. एन. भंगाळे, प्रा. एस. ए. कोळी, डॉ. बी. एस. भालेराव, प्रा. डी. ए. मस्की, प्रा. शिवाजी पाटील, डॉ. जनार्दन देवरे, प्रा. प्रदीप वाघ, प्रा. देसले यांची उपस्थिती होती. राजेंद्र मराठे व प्रवीण तडवी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.