<
जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त प्रज्ञाचक्षु बांधवांना हायजेनीक किट्सचे वाटप
जळगाव- जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत जळगाव शहरातील प्रज्ञाचक्षु बांधवांना हायजेनीक किट्सचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी जळगाव पीपल्स बँकेचे चेयरमन श्री. अनिकेत पाटील, नॅबचे सचिव श्री. सी.डी. पाटील, नॅबचे संचालक श्री. सुनील चौधरी, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष श्री. गनी मेमन, चेयरमन श्री. विनोद बियाणी, रेड क्रॉस दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे नोडल ऑफिसर श्री. जी.टी. महाजन, आपत्ती व्यवस्थापन चेयरमन श्री. सुभाष सांखला, वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सुरळकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्थिक करताना नोडल ऑफिसर श्री. जी.टी. महाजन सांगितले कि, गेल्या चार वर्षांपासून रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना सर्वतोपरी सहकार्य करीत आहे आणि भविष्यात हि करत राहील. दृष्टी नसताना हि एका सुदृढ व्यक्तीसारखे काम करणारे तुम्ही सर्वच समाजासाठी प्रेरक आहात. नॅबचे सचिव श्री. सी.डी. पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, बऱ्याच वेळा आपण आपल्या डोळ्यांच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा करतो. त्यांचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. नॅब या संस्थेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील प्रज्ञाचक्षु बांधवांना विविध प्रकारे मदत केली जाते. शालेय स्तरावर मुलांची डोळे तपासणी शिबीरे राबविली जातात. जेणेकरून लहान वयातच डोळ्यांविषयी काही अडचण असल्यास लवकर लक्षात येऊन त्यावर उपचार करणे शक्य होईल.
रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी परमेश्वराने दिलेले आयुष्य आपण आनंदात आणि सकारात्मक जगले पाहिजे आणि सतत त्याला धन्यवाद दिले पाहिजे. देवाने आपल्यासाठी नक्कीच काहीतरी चांगले विचार करून ठेवला आहे अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या. जळगाव पीपल्स बँकेचे चेयरमन श्री. अनिकेत पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि रेडक्रॉस सारख्या संस्था या समजत निस्वार्थ भावनेने कार्य करीत आहेत ज्यामुळे अनेक गरजू लोकांना मदत मिळत असते. रेडक्रॉसच्या आणि नॅब यांच्या सहकार्याने भविष्यात हि प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी विविध उपक्रम राबविले जातील. रेडक्रॉसचे चेयरमन श्री. विनोद बियाणी यांनी रेडक्रॉसच्या सर्व दवाखान्यांमध्ये प्रज्ञा चक्षु बांधवांना विनामूल्य उपचार सुविधा मिळणार असल्याची घोषणा केली. याचे सर्वांनी मनापासून स्वागत केले. तसेच रेडक्रॉस मार्फत सुरु असलेल्या शहरातील चार हि दवाखान्यांची माहिती उपस्थित सर्वांना देण्यात आली.
उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्वांना हायजेनीक किट्सचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा यांनी केले. या कार्यक्रमासाठी रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रमुख श्री. सोपान गणेशकर, सौ.सुवर्णा चव्हाण, श्री. शोएब शेख, रेडक्रॉसचे श्री. संजय साळुंके, श्री.दीपक सुरळकर, श्री. योगेश सपकाळे यांनी परिश्रम घेतले.