<
जळगांव(प्रतिनीधी)- पाचव्या परिवर्तन अभिवाचन महोत्सवात आज मूळ हिंदी लेखक अब्दुल बिस्मिल्लाह याच्या दंतकथा ह्या साहित्य कृतीचे भारत सासणे यांनी केलेल्या अनुवादाचे अभिवाचन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा जयदीप पाटील, नाट्यकर्मी पियुष रावल, मनीष वाणी तसेच ‘हे मृत्युंजय’ नाटकातील कलाकार नितीन वाघ लाभले.खरं तर कथा कोंबड्याची पण हळू हळू सुरू झालेला प्रवास कथा नेमकी कोंबड्याची आहे की माणसाची असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण होत जातो. प्रेक्षक कोंबड्याच्या आयुष्याशी आपले आयुष्य तोलून पाहतो. कोंबड्याची जगण्याची प्रबळ इच्छा तो स्वतःत अनुभवतो. स्वार्थाने, लालसेने अंध झालेले रक्तपिपासू मालक माणसे कोंबड्यासारखेच आपल्या आयुष्यात तो अनुभवतो.गावाकडे गावभर हिंडणारा कोंबडा शहरात आल्यावर शहरी खुराड्यात रमत नाही. पोटासाठी प्राण्यांना खाणारे प्राणी नैसर्गिक, पण भुकेसाठी प्राण्यांची शेती करणारा माणूस खरंतर प्राणी तरी आहे का असा प्रश्न पडलेला कोंबडा माणसांच्या जगात जीव वाचवत फिरतो. कोंबड्याच्या दृहतीने माणसाच्या जगाचं दर्शन हा वेगळा अनुभव आजच्या अभिवाचनाने दिला. खरंतर हर्षल पाटील उत्तम अभिवाचक आहेतच पण त्यांच्या दिग्दर्शक कौशल्याने रसिक प्रेमरसात बुडाले. शितल पाटील, अक्षय नेहे व हर्षल पाटील यांनी समरस होऊन अभिवाचन केले तर राहुल-लिना निंबाळकर यांच्यातील प्रेम प्रसंगांना रसिकांनी भरभरून दाद दिली. कोंबड्या कोंबडीच्या प्रणय चित्रपटाच्या प्रेमप्रसंगांपेक्षा अधिक खरा वाटला.अभिवाचन महोत्सवाला राजू मामा भोळे, आर्यन पार्क व इंजिनियर असोसिएशनचे सहकार्य लाभले आहे. यावेळी मान्यवरांचे स्वागत अमित माळी व हर्षदा कोल्हटकर यांच्या हस्ते करण्यात आले. आजच्या ‘दंतकथा’ अभिवाचनाची संकल्पना किशोर पवार, निर्मिती निलीमा जैन, दिग्दर्शन हर्षल पाटील, नेपथ्य राजू बाविस्कर, संगीत मंगेश कुलकर्णी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे मंजुषा भिडे यांनी केले. उद्या भुसावळ येथील विरेंद्र पाटील दिग्दर्शित ‘झेंडूची फुले’ ह्या साहित्य कृतीचे अभिवाचन केले जाणार आहे, उपस्थितीचे आव्हान परिवर्तनतर्फे करण्यात आले आहे.