<
जळगाव – (प्रतिनिधी) – धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय आणि लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने बहिणाबाईंची पुण्यतिथी ३ डिसेंबर हा दिवस “लेवा गणबोली” दिवस साजरा केला.
मंचावर लेवा गणबोली अभ्यासक डॉ. अरविंद नारखेडे , शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे , लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी , कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. प्रिती बोंडे प्रा. देवयानी पाटील उपस्थित होते.
बहिणाबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी ३ डिसेंबर हा दिवस लेवा गणबोली दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आधी सभेमध्ये ठराव मंजूर केलेला आहे. हाच मानस लक्षात ठेऊन लेवा गणबोलीचे अभ्यासक डॉ. अरविंद नारखेडे यांना आपण कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित केले आहे. दुग्ध शर्करा योग असा कि , १७ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील तिसरे लेवा गणबोली साहित्य परिषदेचे आयोजन हे खिरोदा / फैजपूर येथे आयोजित करण्याचे निश्चित झाले आहे. या लेवा गणबोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सर्वानुमते डॉ. अरुण नारखेडे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने प्राचार्य डॉ राकेश चौधरी यांनी डॉ. अरुण नारखेडे सत्कार केला. तसेच लेवा गणबोली साहित्य संमेलनाच्या आयोजनात नेहमी पुढाकार घेणारे मा. तुषार वाघुळदे यांचा देखील सत्कार प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी केला.
डॉ. अरुण नारखेडे यांनी आपल्या मनोगतात बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याने जगाला वेड लावले त्यातील तत्त्वज्ञान , संस्कृती , निसर्ग याचे वर्णन जगाला भावले पण हे तत्त्वज्ञान ज्या बोली लेवाभाषेतुन सांगितले त्याकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष झाले. बहिणाबाईंची काव्य बोली “लेवा गणबोली” त्या बोलीमध्ये तत्वज्ञान वहन करायची जबरदस्त ताकद आहे. हे लक्षात आणून देण्यासाठी लेवा गणबोली जतन , संवर्धन व रक्षण मोहीम सुरू केलेली आहे. याच उद्दिष्टानुसार लेवा गणबोलीचे राज्य स्तरीय संमेलनाचे आयोजन करून या बोलीभाषेकडे सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न या अश्या कार्यक्रमातुन आम्ही करीत आहोत. बहिणाबाईंची काव्य-बोली हि लेवागण बोली आहे. हे सर्वांच्या नजरेस आणून देण्यासाठी ” ३ डिसेंबर हा दिवस बहिणाबाईंची पुण्यतिथी दिनानिमित्त ‘लेवा गणबोली दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो ” असे लेवा गणबोली अभ्यासक डॉ. अरविंद नारखेडे यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. देवयानी पाटील आणि आभार डॉ. निलेश चौधरी यांनी मानले.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समवेत विद्यार्थी उपस्थित होते.