
जळगाव(कबचौउमवी) : संशोधन ही चिंतन प्रक्रिया आहे, ती निरंतर सुरू असते ती कधीही थांबत नाही. त्यामुळे केवळ पीएच.डी. किंवा नोकरी मिळविण्याच्या हेतूने संशोधन करू नये, असे आवाहन ग्रामीण साहित्यिक व समीक्षक डॉ. वासुदेव मुलाटे यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राच्या वतीने शनिवारी संशोधन पद्धती या विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याचे उद्घाटन ग्रामीण साहित्यिक व समीक्षक डॉ. वासुदेव मुलाटे यांनी केले. विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक व मराठी विभाग प्रमुख प्रा. म. सु पगारे हे अध्यक्षस्थानी तर प्रमुख अतिथी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख डॉ. सतीश बडवे हे होते. डॉ. मुलाटे म्हणाले की, संशोधकाकडे जिज्ञासूवृत्ती, इच्छाशक्ती, सातत्यता, आवड,
निःपक्षपणा हे गुण असणे आवश्यक आहे. संशोधन करण्याचा उद्देश केवळ पीएच.डी. पदवी किंवा नोकरी मिळविण्यासाठी नसावा. संशोधन ही सातत्यपूर्ण गोष्ट आहे. समाजोपयोगी संशोधन करण्याकडे भर असावा, असेही ते म्हणाले…
प्रा. म. सु. पगारे म्हणाले की, संशोधन करण्यासाठी साक्षर असणे आवश्यक नाही. कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या निरक्षर असूनही त्यांच्या कवितांमधून त्यांची संशोधनवृत्ती दिसून येते. सूत्रसंचालन डॉ. दीपक खरात, आभार मयूरी सोनवणे यांनी मानले. प्रा. सतीश बडवे यांच्या अध्यक्षतेखाली संशोधन, संशोधक आणि संशोधन प्रक्रिया यावर झालेल्या चर्चेत डॉ. फुला बागुल, डॉ. संतोष खिराडे यांनी भाग घेतला. संशोधनाचे विविध आयाम यावरील चर्चेत डॉ. वासुदेव वले, डॉ. अनिल चिकाटे, डॉ. सतीश म्हस्के, डॉ. योगिता पाटील, डॉ. अक्षय घोरपडे, डॉ. रमेश माने,महेश सूर्यवंशी यांनी भाग घेतला.