<
जळगाव (प्रतिनिधी) भुसावळ तालुक्यातील गावात एकाच दिवशी तीन विवाह होत असताना चाईल्ड लाईन व पोलिसांच्या चौकशीत दोन बालविवाह आढळली त्यानंतर पुढील कार्यवाही करून हे बालविवाह थांबविले. चाईल्ड लाईन टीमला एकाच बालविवाहाची माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार चाइल्ड लाईन टीम सदस्य यांनी मा. बालकल्याण समितीच्या आदेशानुसार स्थळभेट केली. मुलीचे कागदपत्र तपासले असता मुलगी अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर भुसावळ पोलीस स्टेशन चे अधिकारी PSI अमोल पवार व त्यांचे सहकारी यांच्या मदतीने बालविवाह रोखण्यात आले. त्यानंतर घटनेस्थळी गावात तीन विवाह होत असल्याची माहिती मिळाली. त्याचप्रमाणे दुसऱ्या होणाऱ्या विवाहस्थळी भेट देऊन मुलीचे व मुलाचे वयाची पडताळणी केली असता ती मुलगी ही अल्पवयीन असल्याचे आढळून आले. त्यामुळे तोही बालविवाह रोखण्यात आला पुढे तिसऱ्या विवाहस भेट दिली असता मुलगी मुलाचे पालक कागदपत्र घेऊन उपस्थित होते. कागदपत्रानुसार मुलगी व मुलगा वयात असल्याने चाईल्ड लाईन टीम व पोलीस अधिकारी यांनी विवाहास शुभेच्छा दिल्या.
या बालविवाह रोखण्याकामी चाईल्ड लाईन समन्वयक श्री.भानुदास येवलेकर टीम सदस्य कुणाल शुक्ल,निलेश चौधरी,रंजना इंगळे, प्रसन्ना बागल यांनी काम पाहिले.