<
Vedat Marathe Veer Daudale Saat : या चित्रपटाचं कोल्हापूरमधील पन्हाळा किल्ल्यावर चित्रीकरण सुरु होतं. त्या दरम्यान तटबंदीवरुन पडून एक जण जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.कोल्हापूर: पन्हाळा गडावरील सज्जा कोठी परिसरात महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना सेटवरील घोड्यांची देखभाल करणारा एक तरुण तटबंदीवरून पडून गंभीर जखमी झाला होता. गेल्या दहा दिवसांपासून त्याच्यावर कोल्हापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते मात्र आज पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे.
पन्हाळा गडावर गेल्या काही दिवसांपासून महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असताना सज्जा कोटी येथे तटबंदीवरून १९ वर्षीय नागेश प्रशांत खोबरे (वय १८, रा. हिप्परगा, जि. सोलापूर) १९ मार्च रोजी रात्रीच्या साडेनऊच्या सुमारास सज्जा कोठी परिसरात नागेश खोबरे हा मोबाइलवर बोलत तटबंदीकडे गेला. अंधारात तटबंदीचा अंदाज न आल्याने तो तब्बल शंभर फूट खाली दरीत पडला होता यामुळे नागेश गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला व छातीला गंभीर इजा झाली होती.
लोकांनी दोरीच्या साह्याने त्याला बाहेर काढले होते व उपचारासाठी तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, गंभीर जखमी झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या दहा दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी (दि. २८) पहाटे जखमी नागेश खोबरे या तरुणाचा मृत्यू झाला.
नागेश चित्रपटाच्या सेटवर घोड्यांची देखभाल करत होता त्याचा अपघात झाला. यावेळी जखमी नागेशला उपचारासाठी दाखल केल्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बोलवलेल्या व्यवस्थापकांनी त्याच्या उपचाराचा खर्च देण्याचे नातेवाईकांकडे कबूल केले होते. मात्र, गेल्या दहा दिवसात काहीच खर्चाची रक्कम मिळाली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच उपचाराचे पैसे मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने मंगळवारी दिवसभर मृतदेह रुग्णालयातच पडून होता असे नातेवाईकांनी सांगितले आहे.दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा वेढात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपट प्रदर्शना आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील सात कलाकारांच्या भूमिका व त्यांच्या वेशभूषा बाबत देखील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.