<
ढगाळ वातावरणामुळे राज्यसहित खान्देशातील शेतकरी बांधव चिंताग्रस्त अवस्थेत आहे. राज्यातील काही भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात आज आणि उद्या (30, 31 मार्च) असे दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. मात्र, शेतकऱ्यांनी अति भीती बाळगण्याचं कारण नाही. मात्र, सावधानता बाळगावी असं आवाहन ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी केले.
या भागात पावसाचा इशारा
मुंबईसह कोकणातील चार जिल्हे, विदर्भातील बुलढाणा ते गोंदिया, वाशिम ते गडचिरोली अशा 11 जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, कोल्हापूर सांगली आणि सोलापूरपर्यंत अशा 11 जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यताही माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, जळगावमध्ये देखील आज ढगाळ वातावरण आहे. यामुळे उन्हाचा पारा काहीसा घसरलेला दिसून आला. त्यामुळं उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळताना दिसून आले.