
आनंदराज आंबेडकर यांची उपस्थिती।
जळगाव, ता. १ : येथील सरदार वल्लभभाई पटेल भावनात रविवारी (ता. २) व सोमवारी (ता. ३) राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनानिमित्त रविवारी सकाळी साडेआठला रेल्वेस्थानकाजवळील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासून संविधान सन्मान रॅली निघणार आहे. रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर रॅलीचे नेतृत्व करणार आहेत.
सकाळी दहाला आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. संमेलानाचे अध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर आहेत. स्वागताध्यक्ष भरत शिरसाट असतील. बुद्धिस्ट मॉनुमेठ्यस डेव्हलपमेंट कौन्सीलचे अध्यक्ष डॉ. अरविंद अलोक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे, प्रसिद्ध साहित्यिक डॉ. धनराज डाहट, मुकुंद सपकाळे, दिलीप जाधव, अॅड. राजेश झाल्टे, जयसिंग वाघ, डॉ. प्रा. म. सु. पगारे, माधवी खरात, पंढरीनाथ गायकवाड आदी प्रमुख पाहुणे राहतील. सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत संमेलन सुरू राहील. संमेलनात राज्यातील ३०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
संमेलनात मुंबईच्या बौद्ध साहित्य प्रसार संस्थेतर्फे जीवन गौरव पुरस्कार’ साहित्यिक जयसिंग वाघ यांना देण्यात येणार आहे. श्री. वाघ यांची एकूण पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध वृत्तपत्रात त्यांचे वैचारिक लेखन सुरू असते. विविध पुस्तकांची समीक्षा प्रसिद्ध झाली असून, विविध ठिकाणी भाषणे झाली आहेत. नागरिकांनी संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ, प्रदेश समन्वयक मुकुंद सपकाळे, डॉ. अशोक सैंदाणे, धनंजय मोतिराय, विवेक सैंदाणे यांनी केले आहे.