<
जळगांव(प्रतिनीधी)- पाचव्या परिवर्तन अभिवाचन महोत्सवाच्या सहाव्या पुष्पात आज “अभिवाचन महोत्सव वाचन संस्कृती रुजवण्यास पूरक आहे का?” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. सदर चर्चासत्रात चर्चक म्हणून पी. पी. माहुलीकर कुलगुरू कबचौ उमवि, डॉ. प्रदिप जोशी, श. दि. वडोदकर, गनी मेमन, जयदीप पाटील व प्रा.निरुपमा वानखेडे लाभले. हा अभिवाचन महोत्सव संजीवनी फौंडेशनच्या अंतर्गत सुरू आहे.रसिकांशी संवाद साधतांना मान्यवरांनी अभिवाचन महोत्सव वाचन संस्कृती वाढवण्यासाठी अतिशय महत्वाचे असल्याचे स्पष्ट मत मांडले. अभिवाचनाच्या प्रयोगांमधून पात्रांविषयी रसिकांच्या मनात कुतूहल आस्था निर्माण होत जाते व त्यात वाचनाची उत्सुकता निर्माण होते. घरातील टिव्ही, मोबाईल व इंटरनेट यामुळे छापील पुस्तकांची वाचक संख्या जरी कमी झाली असली तरी ईबुक्सच्या वाचनसंख्या वाढत आहे. परिवर्तनने अभिवाचन महोत्सवात शाळेतील विद्यार्थ्यांनाही सहभागी करून अभिवाचनांचा पायंडा शाळांमध्ये देखील सुरू केला आहे. बऱ्याच शाळांनी आता अभिवाचनांच्या स्पर्धा सुरू केल्या हे खरे महोत्सवाचे यश. महोत्सवाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात परिवर्तनने महाराष्ट्राच्या सांस्कृतीक पटलावर जळगावची ओळख निर्माण केली आहे. आता ते जळगाव ‘वाचणारे गाव’ म्हणून ओळख निर्माण करेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. महाराष्ट्राभर अभिवाचनाचे प्रयोग जरी होत असले तरी परिवर्तनने वाचनसंस्कृतीची चळवळ उभी केली आहे. मान्यवरांनी प्रकाशकांना, पालकांना तसेच शाळांच्या मुख्याध्यापकांनादेखील महोत्सवात सहभागाचे आव्हान केले. अभिवाचन महोत्सवाला रोटरी वेस्ट, राजू मामा भोळे, आर्यन पार्क व इंजिनियर असोसिएशनचे सहकार्य लाभले आहे. महोत्सवाच्या आवड निर्माण झालेल्या बऱ्याच प्रेक्षकांना जागे अभावी परत जावे लागले. पुढील वेळी कार्यक्रम मोठ्या सभागृहात घेण्याचे आवाहन प्रेक्षकांकडून करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले, उद्या मुंबईच्या गिरीष पतके दिग्दर्शित व विजय तेंडुलकर लिखित ‘७४ पावसाळ्याचा जमाखर्च’ या साहित्य कृतीचे अभिवाचन करण्यात येणार आहे.