<
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात समता रजनी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
जळगाव-(प्रतिनिधी) – येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था महाज्योती, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने १२ एप्रिल, २०२३ रोजी सायं ६.०० वाजता छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह, जळगाव येथे क्रांतीगाथा वाद्य वृंदाचा संगीतमय नजराणा समता रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन दिलीप केदार, पार्श्वगायिका आवाज महाराष्ट्राचा ज्योती चौहान, गायक सायबा, सचिन जावळे व संतोष चव्हाण हे आपल्या गीतांच्या माध्यमातून स्वर संगीताच्या साथीत सुरेल वंदन करण्यात आले. गायकांचा कसलेला दमदार आवाज, वादकांचे सराईत हात, गाण्यांची चपखल शब्द रचना, सुस्पष्ट ध्वनी यंत्रणा अशा उत्साही माहौल मध्ये नाट्यगृह भीमगितांनी दुमदुमले. तब्बल तीन तास रसिक आनंदात न्हाऊन निघाले, भीमगितांच्या तालावर युवक-युवती ठेका घेऊन नाचले सुद्धा ! भिमगितांच्या गाण्यांनी छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह अक्षरशः दुमदुमला होता.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ.राजू मामा भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, बीसएनएल महाप्रबंधक संजय केशरवाणी, भुसावळ रेल क्षेत्र प्रबंधक सुमित जगताप, मनपा आयुक्त श्रीमती विद्या गायकवाड, अध्यक्ष केशवस्मृती प्रतिष्ठान भरत दादा अमलकर, मनपा मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रकांत वानखेडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, प्रशिक्षणार्थी पोलिस उप अधिक्षक ए बी पवार, नगरसेविका श्रीमती सरिता नेरकर, नेहरु युवा केंद्र जिल्हा युवा समन्वयक नरेंद्र डागर, जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काका साहेब खंबाळकर इत्यादी उपस्थित होते,सर्व प्रमुख उपस्थितीतांचे स्वागत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास जळगावकरांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला, आवाज महाराष्ट्राचा म्हणून ओळख असलेल्या ज्योती चौहान, वरच्या पट्टीत आवाज असलेले गायक सायबा, सचिन जावळे व संतोष चव्हाण यांनी नाट्यगृहातील रसिकांना खूर्चीत डोलायला आणि उठून उभे राहून नाचायला भाग पाडले. प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन दिलीप केदार यांनीही दमदार सूत्रसंचालनासह मिमिक्रीचा तडका दिला. गायकांना साथसंगत करणारे पाचही वादक सुद्धा कसलेले कलावंत होते तसेच जळगावचे पथनाट्य कलावंत तथा सुप्रसिद्ध शाहीर विनोद ढगे यांनीही शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला, सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समाज कल्याण लेखाधिकारी मनिषा पाटील व विनोद ढगे यांनी केले व आभार जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी केले तसेच राष्ट्रगीताने सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सर्व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.