<
जळगाव, दि. 18 (जिमाका वृत्तसेवा) :- ‘जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची’ या अभिनव उपक्रमाची जळगाव जिल्ह्यात परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या कार्यालयात जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन करावा. अशा सुचना जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी दिल्यात.
शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची या अभिनव उपक्रमाची पूर्व तयारी आढावा बैठक आज जिल्हाधिकारी श्री. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. तर मुख्यमंत्री महोदयांचे खाजगी सचिव डॉ अमोल शिंदे, मुख्यमंत्री सचिवालयाचे कैलास देवरे, जिल्ह्यातील प्रांताधिकारी व तहसिलदार व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी श्री. महाजन पुढे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांची यादी तयार करावी. या योजनांची माहिती, योजनेच्या लाभासाठी पात्रतेचे निकष आदि माहिती सर्वसमान्य नागरीकांपर्यंत पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे, त्यांच्याकडून अर्ज भरुन घेणे आदि कार्यवाही ही 15 मे पूर्वी करावयाची असल्याने प्रत्येक विभागाने जिल्हा व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना दिल्यात.
डॉ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे ध्येय आहे. या अभियानाचे समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यात तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांची भूमिका महत्वाची असून यासाठी त्यांची तालुकानिहाय बैठक घेण्याची सूचना केली तसेच आवश्यक तेथे प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
श्री. देवरे म्हणाले, जळगाव जिल्ह्यात यापूर्वी लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने चाळीसगाव व जामनेर तालुक्यात हा अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. याची दखल राज्य शासनाने घेतली असून हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत 15 जूनपूर्वी जिल्हास्तर व तालुकास्तरावर दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करुन नागरीकांना योजनांचा थेट लाभ प्रदान करावयाच्या असल्याने सर्व विभागांनी त्यादृष्टिने परिपूर्ण नियोजन करुन हे अभियान यशस्वी करावे.
बैठकीच्या प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भारदे यांनी या उपक्रमाची व प्रत्येक विभागाने करावयाच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली.