<
जळगाव-(प्रतिनिधी)- संपूर्ण देशात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यात राजस्थानमध्ये हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीला पिण्याचे शुद्ध पाणी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध रहावे, यासाठी आताच सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचदृष्टीने जैन इरिगेशनने निर्माण केलेल्या पाणी निम्म्यानं, उत्पादन दुप्पटीने देणारे ठिबक, स्प्रिंकलर्सचे उच्च कृषि तंत्रज्ञान राजस्थानमधील शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी जैन इरिगेशनने पुढाकार घेऊन त्याचा प्रचार-प्रसार करावा, यासाठी राजस्थान सरकार जैन इरिगेशनसोबत असेल; असे प्रतिपादन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केले.
जैन इरिगेशनचे कृषिविषयक हायटेक तंत्रज्ञान समजुन घेण्यासाठी आले असता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत बोलत होते. त्यांच्यासोबत राजस्थानचे कृषिमंत्री लालचंद कटारिया, खाण व गोपालन मंत्री प्रमोद भाया, आमदार रोहीत बोहरा, मुख्य सचिव कुलदिप रांका उपस्थित होते. यावेळी त्यांचे स्वागत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. याप्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, जैन फार्मफ्रेश फुडूसचे संचालक अथांग जैन उपस्थित होते.
पाण्याची टंचाई पाहता शेतीला पाट पद्धतीने पाणी न देता ते ठिबक, स्प्रिंकलर्स अशा अत्याधुनिक सिंचन तंत्राद्वारे द्यावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. राजस्थानमधील शेतकरी हा बदल आत्मसात करील अशी अपेक्षाही व्यक्त केली. राजस्थान देशातील सर्वात मोठे राज्य आहे. मोठे क्षेत्रफळ आहे. शेतीवर मोठी लोकसंख्या अवलंबून आहे. परंतु पाण्याची उपलब्धता खूपच कमी आहे. भविष्यात पाण्याची तीव्रता अधिक जाणवेल. त्यामुळे ठिबकचे महत्त्व राजस्थाने समजले आहे. येणाऱ्या पिढीसाठी ठिबकचा राजस्थानमध्ये प्रचार-प्रसार करण्याचा प्रयत्न करणार आहे. पाण्याचा पूर्ण क्षमतेने उपयोग व्हावा आणि शेतीची उत्पादकता वाढावी यासाठी आताच शेतकऱ्यांनी आवश्यक पावले उचली पाहिजे. ठिबक सिंचनासह आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी तसेच राजस्थानमधील प्रत्येक शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी जैन इरिगेशनच्या सहकार्याने यापुढेही नवनवीन संकल्पना राबवून राजस्थान समृद्ध करणाचे सुतोवाच त्यांनी केले. यासाठी जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले. पाण्यावर महत्त्वाचे कार्य करणाऱ्या इस्त्राइलमध्येसुद्धा जैन इरिगेशन कार्य करीत आहे. तेथील त्यांचे पाणी आणि शेतीविषयक कार्य मी जवळून पाहिले आहे. इस्त्राइल येथील हे तंत्रज्ञान भारतात जैन इरिगेशनने आणले याचा अभिमान असल्याचेही मुख्यमंत्री अशोक गहलोत यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी जैन फार्मफ्रेश फूड्स लि. च्या मसाले प्रकल्पासही भेट दिली. या प्रकल्पासाठी काही कच्चा माल हा राजस्थान येथून येत असल्याने या प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेतली. प्रकल्पासाठी राजस्थानच्या शेतकऱ्यांचा अधिकाधिक सहभाग नोंदविण्याचे सुतोवाच केले.