<
जळगाव:- आयुष्यात मूल्य शिक्षण फार महत्वाचे आहे. मूल्य शिक्षणाची सुरुवात घरातून होते. त्यासाठी पाटी, पुस्तक,वही, पेन्सिल इ.गरज नसते.घरातून होणारे संस्कार हा मूल्य शिक्षणाचा पाया आहे. असे प्रतिपादन डॉ. श्रद्धा माळी यांनी केले.
क्रुती फाऊंडेशन व एसडी सिडच्या संयुक्त विद्यमाने “मूल्य संस्कार काळाची गरज” या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत डॉ. श्रद्धा माळी बोलत होत्या.
महाराणा प्रताप माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी प्रतिपादन केले की, मूल्य शिक्षणामूळे आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास होतो.सुजाण नागरिक म्हणून आपण आपल्या मनात मूल्य शिक्षण रूजवणे महत्वाचे आहे. तसेच पोलीस बिनतारी संदेश विभागाचे श्री. अमित माळी सर यांनी “सकारात्मकता आणि स्वयंशिस्त” या विषयावर अनमोल असे मार्गदर्शन या कार्यशाळेत केले. या कार्यशाळेत डॉ. श्रेयस महाजन यांची देखील उपस्थिती लाभली होती, त्यांनी “नकारात्मकता आणि सकारात्मकता” यांचा शरीरावर होणारे परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले.
क्रुती फाऊंडेशनचे सचीव श्री. जी.टी. महाजन यांनी मूल्य शिक्षणाची गरज व त्याचा व्यक्तीमत्वावर होणारा परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यशाळेत सुमारे 90 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती साधना शर्मा यांनी सांगितले की या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होईल.
एसडी सिडचे समन्वयक श्री. प्रविण सोनवणे यांनी सदरच्या कार्यशाळेचे आयोजनात परिश्रम घेतले.