<
जळगाव-(प्रतिनिधी)- गांधी विचार नवीन पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी गांधी तीर्थ ही अप्रतिम आणि परिपूर्ण स्थळ आहे. गांधी तीर्थ नव्या पिढीला प्रेरक ठरत असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रीया राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिली.
गांधी रिसर्च फाउंडेशनचे जागतिक दर्जाचे गांधी तीर्थ समजून घेण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत कृषिमंत्री लालचंद कटारिया, खाण व गोपालन मंत्री प्रमोद भाया, आमदार रोहीत बोहरा, मुख्य सचिव कुलदिप रांका यांची देखील उपस्थीती होती. “गांधी तीर्थचे निर्माते भवरलालजी जैन यांनी दूरदृष्टीतून अदभूत, शानदार असे तीर्थ निर्माण केले आहे. भविष्यातील पिढीला हे कार्य प्रेरणा देणारे एक यशस्वी पाऊल म्हणावे लागेल. गांधी विचार सहज समजावे या मुख्य उद्देशासाठी कदाचित असे म्युझियम अन्य कुठेही नसावे. या पवित्र वास्तुची निर्मिती साकारली व गांधी विचार नव्या पिढीपर्यंत पोहचविण्यास ते यशस्वी झाले याबद्दल त्यांच्या कार्याला मन:पूर्वक अभिवादन करतो.” अशी प्रतिक्रिया राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिली. तब्बल तीन तासाहून अधिक वेळ देऊन अशोक गहलोत यांनी गांधी तीर्थ या म्युझियमची परिपूर्ण माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिष्टमंडळसुद्धा होते. यावेळी त्यांचे स्वागत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. याप्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, जैन फार्मफ्रेश फुडूसचे संचालक अथांग जैन, सौ. अंबिका जैन व जैन परिवारातील सदस्य उपस्थित होते. गांधीतीर्थसह जैन हिल्स येथील श्रद्धाधाम व परिश्रम यांची देखील पाहणी करून माहिती घेतली.