<
महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या निमित्ताने महापालिकेत १ मे रोजी ध्वजारोहनाच्या कार्यक्रम घेण्यात आला.त्यासाठी पालिकेच्या मुख्य इमारती मधील सुमारे २ हजार ५०० कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र कार्यक्रमासाठी अवघे दोनशे कर्मचारी उपस्थित राहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणे महापालिका आयुक्तांनी अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त आयोजित राष्ट्रध्वज वंदन व संचलन कार्यक्रमासाठी पुणे महापालिकेतील सर्व अधिकारी व सेवकांची उपस्थित अनिवार्य आहे. या अनुषंगाने सर्व खातेप्रमुख यांनी आपल्या नियंत्रणाखालील सर्व विभाग व उप विभागातील सेवकांना ध्वजारोहण कार्यक्रमाचे अगोदर किमान १० मिनिटे महापालिका भवन प्रांगणात उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात.
या कार्यक्रमास उपस्थित असलेले अधिकारी आणि सेवकांची उपस्थिती घेण्यात यावी व उपस्थितीचा अहवाल सर्व खातेप्रमुख यांनी न चुकता ४ मे पर्यंत कामगार कल्याण विभागाकडे सादर करावा. ज्या अधिकारी आणि सेवकांना ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहणे शक्य नसेल त्यांनी नजिकच्या शासकीय अथवा सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहून तसे लेखी प्रमाणपत्र खातेप्रमुखांकडे सादर करावे.
तरी, सर्व संबंधितांनी राष्ट्रीय पोषाख परिधान करून ध्वजारोहण कार्यक्रमाचे अगोदर किमान १० मिनिटे महापालिका भवन प्रांगणात उपस्थित रहावे, असे आदेशात म्हटले होते. तरीही या कार्यक्रमासाठी अवघे दोनशे कर्मचारी उपस्थित राहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संतापलेल्या महापालिका आयुक्तांनी अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.