<
कोणत्याही राजकीय पक्ष, उमेदवार किंवा अन्य काेणत्याही संस्थेने मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटीच्या (एमसीएमसी) मंजुरीशिवाय मतदानाच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी (सायलेन्स पिरियड) कोणतीही जाहिरात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करू नये असे निवडणूक आयोगाने रविवारी म्हटले आहे.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका १० मे रोजी होणार असून त्या पार्श्वभूमीवर आयोगाने ही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.कर्नाटकमध्ये हाेणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सुरू असलेला प्रचार उद्या, सोमवारी संपणार आहे. राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचाराची पातळी खाली आणू नये तसेच अतिशय गंभीरपणे प्रचारमोहीम राबवावी असे निवडणूकआयोगाने सांगितले.
निवडणूक आयोगाने कर्नाटकमधील वृत्तपत्रांच्या संपादकांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे की, पत्रकारांच्या आचरणाबद्दल प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेने नियम तयार केले आहेत. वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यासह अन्यसर्व बाबींबद्दल हे नियम:- पत्रकारांना लागू असतील. नियमभंग झाला तर पत्रकारांना जबाबदार धरण्यात येईल, असे निवडणूक आयाेगाने म्हटले आहे.
नियमांचे काटेकोर पालन करा:- निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे की, मतदानाचा दिवस व त्याच्या आदल्या दिवशी राजकीय पक्ष, उमेदवार किंवा अन्य काेणत्याही संस्थेने जिल्हा किंवा राज्यस्तरावर एमसीएमसीच्या मंजुरीशिवाय जाहिराती प्रसिद्ध करू नयेत. सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.