<
रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरवून भूजल पुनर्भरणाचा ‘लातूर पॅटर्न’ अतिशय उपयुक्त आहे. राज्यात यापुढे रस्त्यांची कामे करताना हा पॅटर्न सर्वत्र राबविण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.
या उपक्रमामुळे रस्त्यावर पावसाचे पाणी जमा न होता, त्याद्वारे भूजल पुनर्भरण होईल. त्यामुळे भूजल पातळीत वाढ होऊन शेतीला मदत होईल. तसेच रस्त्याचे जीवनमान वाढेल. त्यामुळे राज्यात नव्याने मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये या उपक्रमाचा समावेश केला जाईल.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम’ (पीएमआयएस) प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक कामाची विविध टप्प्यावरील माहिती, तसेच काम पूर्ण झाल्यानंतर व्हिडीओ, छायाचित्रे अपलोड करणे आवश्यक असणार आहे.
सर्व अधिकाऱ्यांनी या प्रणालीवर अद्ययावत माहिती अपलोड करावी. रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत, कामांच्या दर्जाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्याचा निपटारा करावा. तक्रारींची पडताळणी करून त्याबाबतची वस्तुस्थिती संबंधितांना अवगत करावी, मराठवाडा, विदर्भासह पाणीटंचाईची समस्या जाणवणाऱ्या इतरही जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी प्राधान्याने करण्यात येईल, असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले आहे.