राज्यातील सुशिक्षित बेरोजगार, होतकरु युवक/युवतींसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ (CMEGP) या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या मार्गदर्शनाने व विकास आयुक्त (उद्योग) यांच्या संनियंत्रणाखाली जिल्हा उद्योग केंद्र (DIC) व जिल्हा खादी व ग्रामोद्योग कार्यालय (KVIB) यांच्यामार्फत करण्यात येते. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP):- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना पूर्णपणे ऑनलाईन आहे. या योजनेकरिता maha-cmegp.gov.in हे ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आलेले असून सदर पोर्टल सुलभतेने कार्यान्वित झालेले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यापूर्वी लाभार्थ्याची यात स्वगुंतवणूक 5 ते 10 टक्के, बँक कर्ज 60 ते 80 टक्के व राज्य शासनाचे अनुदान 15 ते 35 टक्के, असं स्वरूप माहीत असणं आवश्यक आहे.पात्रतेचे निकष:- उत्पादन उद्योग, कृषिपूरक उद्योग व सेवा उद्योग प्रकल्प योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र.
उत्पादन क्षेत्रांतील प्रकल्पासाठी प्रकल्प मर्यादा रु. 50 लाख व सेवा क्षेत्रातील आणि कृषि आधारीत/प्राथमिक कृषी पक्रिया उद्योग प्रकल्पांसाठी प्रकल्प मर्यादा रु. 20 लाख आहे.या योजनेच्या लाभार्थीची शैक्षणिक पात्रता रू. 10 लाखांच्या पुढील प्रकल्पांसाठी किमान सातवी पास व रू. 25 लाखाच्या पुढील प्रकल्पांसाठी किमान दहावी पास आहे. राज्य शासनाकडून प्रकल्प मंजूरीच्या 15 ते 35 टक्के इतके आर्थिक साहाय्य अनुदान स्वरुपात मिळते.